लासलगाव आगाराची दिवाळी भेट; पुणे मार्गावर विशेष ‘परिवर्तन’ बस सेवा दि. २७ पासून सुरू

न्यायभूमी

लासलगाव दिनांक २४ ऑक्टोंबर कैलास उपाध्ये
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गावी येणाऱ्या – जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लासलगाव आगाराच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी लासलगाव ते पुणे दरम्यान दिवाळी जादा वाहतूक बस सेवा सुरू करण्यात येत आहे. ही विशेष बस सेवा मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ पासून प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.
ग्रामीण भागातील बहुतांशी विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग उच्च शिक्षण व नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक आहेत. दिवाळी सणानिमित्त त्यांना गावी येताना प्रवासादरम्यान प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो व मोठा त्रास सहन करावा लागतो.
प्रवाशांची हीच गैरसोय दूर करण्यासाठी लासलगाव आगाराने पुढाकार घेत ही विशेष गाडी सुरू केली आहे. यामुळे निफाड तालुक्यातील प्रवाशांसाठी हा प्रवास अत्यंत सुखकर ठरणार आहे. ग्रामीण भागातील विंचूर, नैताळे, धारणगाव, खेडलेझुंगे, सोमठाणे, पांगरी, नांदूरशिंगोटे यासारख्या ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. दिवाळीच्या काळात प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता,गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी गरजेनुसार सदर अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.
• प्रवाशांच्या सोयीसाठी मार्गाची रचना खालीलप्रमाणे करण्यात आली आहे, सविस्तर मार्ग – लासलगाव – विंचूर – नैताळे – धारणगाव – थडी सारोळा – खेडलेझुंगे – सोमठाणे – पांगरी – मऱ्हळ – नांदूरशिंगोटे – संगमनेर – आळेफाटा – नारायणगाव – चाकण – पुणे.
• वेळापत्रक
लासलगाव येथून सुटण्याची वेळ – दुपारी १३.३० वाजता (दुपारी १:३० वा.)
पुणे येथून परतण्याची वेळ – सकाळी ५.४५ वाजता
• विशेष सेवा व सवलतींची वैशिष्ट्ये :- ही बस पूर्णपणे ‘साधी परिवर्तन’ सेवा श्रेणीतील असणार आहे. प्रवाशांना ऐन वेळी होणारी गर्दी व ताण टाळण्यासाठी बससाठी आगाऊ आरक्षणाची सुविधा लवकरच उपलब्ध करून येईल. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार महिला प्रवाशांसाठी प्रवासाच्या तिकिटामध्ये ५०% सवलत तसेच ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांच्या सवलती नेहमीप्रमाणे लागू राहतील.
• दिवाळी सणात पुणे येथे शिक्षण व नोकरीसाठी असणाऱ्या आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोठ्या रहदारीचा सामना करावा लागतो.
प्रवाशांचा हा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि विनात्रास व्हावा, यासाठी लासलगाव आगाराने पुणे मार्गावर विशेष साधी परिवर्तन बस सुरू केली आहे.
प्रवाशांनी गर्दीच्या वेळी गैरसोय टाळण्यासाठी आगाऊ आरक्षणाचा लाभ घ्यावा.
प्रशांत गुंड,
आगार प्रमुख, लासलगाव आगार






