छतावरील सौर पॅनेलची मंजुरी नेमकी कशी? महावितरणच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह!
प्रत्यक्ष पाहणी झाली का? शेजाऱ्यांच्या मालमत्तेचे नुकसान आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?
न्यायभूमी
लासलगाव दिनांक १६ नोव्हेंबर विशेष वृत्त
लासलगाव परिसरात घरांच्या छतांवर बसविण्यात येणाऱ्या सौर पॅनेल प्रकल्पांच्या प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रत्यक्ष जागेची तांत्रिक पाहणी होते की केवळ कागदोपत्री पडताळणीवर मंजुरी दिली जाते, याचा महावितरणने खुलासा करावा.

छताची हद्द, शेजारील मालमत्तेला संभाव्य धोका, लोखंडी सांगाड्यांची मजबुती आणि विद्युत सुरक्षिततेचे निकष तपासले जातात का? प्रत्येक प्रकल्पाची प्रत्यक्ष तपासणी कोणत्या अधिकाऱ्यांकडून केली जाते?

महावितरणला थेट सवाल : सौर पॅनेलची संरचना कोसळून जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास जबाबदारी कोणाची? नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन काय कारवाई केली?
नाशिक परिमंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लासलगावमधील सौर पॅनेल प्रकल्पांची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून मंजुरीचे अभिलेख, पाहणी अहवाल आणि सुरक्षिततेच्या निकषांची पडताळणी करावी. नियमभंग आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी.
न्यायभूमीचा सवाल : कागदोपत्री मंजुरी पुरेशी आहे की प्रत्यक्ष सुरक्षिततेची खात्रीही केली जाते? चांदवडचे कार्यकारी अभियंता आणि लासलगावचे उपकार्यकारी अभियंता यांनी मौन सोडून सौर पॅनेल मंजुरी व तपासणी प्रक्रियेची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी!

टीप : ही बातमी प्राप्त तक्रारी व उपस्थित झालेल्या शंकांवर आधारित असून, संबंधित बाबींची स्वतंत्र चौकशी आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा अधिकाऱ्याविरोधात गैरप्रकाराचा निष्कर्ष काढलेला नाही.




