
न्यायभूमी
लासलगाव दि.१५ जुलै

लासलगाव येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रात (सबस्टेशन) कार्यरत असलेल्या यंत्रचालकाचा एक धक्कादायक आणि बेजबाबदारपणाचा प्रकार समोर आला आहे.
शासकीय कर्तव्यावर असताना चक्क ‘झोपा काढणाऱ्या’ या कर्मचाऱ्यामुळे लासलगाव सबस्टेशन सध्या खरोखरच ‘रामभरोसे’ चालले आहे की काय,अशी स्थिती निर्माण झाली आहे.
या गंभीर प्रकारामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या उपकेंद्रावर नियंत्रण राहिले आहे की नाही? असा संतप्त सवाल आता वीजग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,लासलगाव सबस्टेशनमध्ये ऑन ड्युटी यंत्रचालक कर्मचारी कर्तव्य बजावत असताना,वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याऐवजी चक्क झोपा काढत असल्याचे दिसून आले.जर कर्तव्य बजावणारे कर्मचारीच अशा प्रकारे बेजबाबदारपणे वागणार असतील, तर येथील जबाबदार अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही का,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
८,१६ की २४ तास? ड्युटीच्या तासांची चौकशी व्हावी !
कर्मचाऱ्यांना नक्की किती तासांची ड्युटी नेमून देण्यात आली आहे ? ८ तास,१६ तास की २४ तास ? याची सखोल चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
कर्मचाऱ्यांच्या अशा वागण्यावरून महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर कोणताही धाक राहिलेला नाही, हेच स्पष्टपणे दिसून येत आहे.
अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत का ?
उपकेंद्रातील या गंभीर अनागोंदी कारभाराकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का? असाही संशय आता व्यक्त केला जात आहे.
अशा कामचुकार आणि गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे गरजेच्या वेळी ग्राहकांना नाहक वीज संकटाचा सामना करावा लागतो.
लासलगाव परिसरातील वीज ग्राहकांचे लक्ष आता महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लागले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन संबंधित कामचुकार कर्मचाऱ्याचे निलंबन होणार का ? आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार का? याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.



