ब्राह्मणगाव विंचूर जिल्हा परिषद शाळेवर कडुलिंबाचे झाड कोसळले
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
लासलगाव दि.०३ जुलै कैलास उपाध्ये
निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव विंचूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर आज शुक्रवार दि.३ जुलै रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास शाळेलगतच्या शेतातील मोठे कडुलिंबाचे झाड उन्मळून कोसळल्याची घटना घडली.
शाळेत त्यावेळी ३१ विद्यार्थी उपस्थित होते. सुदैवाने झाडाचा केवळ शेंड्याचा भाग इमारतीवर पडल्याने मोठी दुर्घटना टळली आणि सर्व विद्यार्थी व शिक्षक सुखरूप बचावले.
झाड कोसळताना झालेल्या प्रचंड आवाजामुळे विद्यार्थ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. वीज पडल्याचा संशय आल्याने घाबरलेले सर्व विद्यार्थी शिक्षक दिलीप फापाळे यांच्याकडे धावत आले.
शाळेत एकच गोंधळ उडाला; मात्र शिक्षकांनी प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवून शांत केले.
या घटनेत शाळेच्या इमारतीवर झाडाच्या फांद्या पडल्याने किरकोळ नुकसान झाले असून, कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ,पालक व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली.
या घटनेनंतर शाळा परिसरातील धोकादायक व जीर्ण झालेल्या वृक्षांची तातडीने पाहणी करून त्यांची छाटणी किंवा हटविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भविष्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा धोकादायक वृक्षांवर त्वरित कारवाई करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात येत आहे.



