लासलगाव रेल्वे स्थानकावर अल्पकालीन पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर
सोडायला येणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय; दहा - पंधरा मिनिटांसाठीही पे अँड पार्कचा भुर्दंड

न्यायभूमी
लासलगाव दिनांक ०५ ऑक्टोंबर प्रतिनिधी कैलास उपाध्ये
निफाड तालुक्यातील लासलगाव हे कांदा व्यापाराचे प्रमुख केंद्र असून, येथील रेल्वे स्थानकाला कांदा वाहतुकीच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे. लासलगाव परिसरासह निफाड पूर्व भागातील अनेक गावांतील नागरिक रेल्वे प्रवासासाठी या स्थानकाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.
नुकत्याच झालेल्या रेल्वे स्थानकाच्या विकासामुळे प्रवाशांना काही सुविधा उपलब्ध झाल्या असल्या, तरी अल्पकाळासाठी वाहन घेऊन येणाऱ्या नागरिकांसाठी अधिकृत पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने मोठी गैरसोय निर्माण होत आहे.
लासलगाव रेल्वे स्थानकावर सध्या पे – अँड-पार्कची सुविधा उपलब्ध असून २४ तासांसाठी २० रुपये शुल्क आकारले जाते. बाहेरगावी जाणारे प्रवासी, रेल्वे स्थानकावर कामानिमित्त येणारे नागरिक तसेच दीर्घकाळासाठी आपली वाहने उभी करणाऱ्यांसाठी ही सुविधा सोयीची व तुलनेने स्वस्त आहे. त्यामुळे नियमित प्रवाशांना या सुविधेचा चांगला उपयोग होत आहे.
मात्र, नातेवाईकांना रेल्वेने सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणारे, तसेच काही कामानिमित्त अवघ्या दहा-पंधरा मिनिटांसाठी किंवा अर्ध्या तासासाठी स्थानकावर येणारे वाहनधारक यांच्यासमोर वेगळीच समस्या निर्माण होत आहे.
अशा वाहनांसाठी रेल्वे स्थानक परिसरात स्वतंत्र अल्पकालीन पार्किंगची अधिकृत जागा उपलब्ध नाही. अल्पकाळासाठी वाहन उभे करायचे असल्यास संबंधितांना पे-अँ-पार्कमध्ये वाहन लावून शुल्क भरावे लागते.

काही नागरिकांना हे शुल्क आणि वाहन पार्क करण्याची पद्धत अल्पकालीन कामासाठी गैरसोयीची वाटते. परिणामी काही वाहनधारक नाईलाजास्तव स्थानक परिसरातील मोकळ्या जागेत किंवा इतरत्र वाहने उभी करतात.
रेल्वे स्थानक परिसरातील काही मोकळ्या जागांवर ‘नो पार्किंग’चे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, नातेवाईकांना घ्यायला-सोडायला येणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी अधिकृत व्यवस्था नसल्याने अनेकदा त्यांना नाईलाजाने वाहन उभे करावे लागते. अशावेळी रेल्वे प्रशासनाची कारवाई झाल्यास वाहनधारकांना दंडाचा सामना करावा लागू शकतो.
• अल्पकालीन पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था हवी
रेल्वे स्थानकावर दीर्घकाळ वाहने उभी करणाऱ्यांसाठी पे – अँड-पार्कची सुविधा योग्य आहे. मात्र, ‘ड्रॉप अँड पिकअप’साठी काही मिनिटांसाठी येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र जागा असणे ही काळाची गरज आहे. रेल्वे स्थानकाच्या विकासामध्ये प्रवाशांच्या वाहन व्यवस्थेचाही सर्वंकष विचार होणे आवश्यक आहे. निफाड पूर्व भागातील अनेक गावांसाठी लासलगाव रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे प्रवासी केंद्र आहे.
त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने नागरिक येथे ये-जा करतात. अशा परिस्थितीत अल्पकालीन वाहन पार्किंगची सुविधा नसल्यामुळे निर्माण होणारी अडचण ही केवळ काही वाहनधारकांची समस्या नसून स्थानकाच्या दैनंदिन वाहतूक व्यवस्थेशी संबंधित प्रश्न आहे.

• नो-पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांना चक्क दोराने बांधले; कारवाईचा अधिकार कुणाचा?
लासलगाव रेल्वे स्थानक परिसरातील नो-पार्किंगच्या ठिकाणी उभ्या केलेल्या काही दुचाकींना चक्क दोराच्या साह्याने बांधून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित वाहनधारकांनी वाहने नेमकी कोणाच्या कारवाईमुळे बांधून ठेवण्यात आली, याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. ही कारवाई रेल्वे प्रशासनाने केली आहे की पे-अँड-पार्कच्या ठेकेदाराने, याबाबत स्पष्टता होणे गरजेचे आहे. जर ही कारवाई पे-अँड-पार्कच्या ठेकेदाराने केली असेल, तर नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना अशा पद्धतीने बांधून ठेवण्याचा अधिकार संबंधित ठेकेदाराला कोणी दिला? रेल्वे प्रशासनाने त्याला याबाबत कोणते अधिकार दिले आहेत का, याची माहिती सार्वजनिक होणे आवश्यक आहे. वाहनधारकांकडून शुल्क वसुली करण्याचा अधिकार आणि वाहनांवर कारवाई करण्याचा अधिकार या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे ठेकेदाराने स्वतःहून अशी कारवाई केली असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे.
दुसरीकडे, जर वाहने रेल्वे प्रशासनानेच दोराने बांधून ठेवली असतील, तर वाहनधारकांसाठी अधिकृत पार्किंगची पर्यायी व्यवस्था का करण्यात आलेली नाही? नातेवाईकांना रेल्वेने सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी काही मिनिटांसाठी येणाऱ्या वाहनधारकांसाठी स्वतंत्र ‘पिकअप-ड्रॉप झोन’ अथवा अल्पकालीन पार्किंगची जागा उपलब्ध करून देणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी नाही का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नो-पार्किंगचे नियम असणे आवश्यक आहे; मात्र नियमांची अंमलबजावणी करताना नागरिकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दहा-पंधरा मिनिटांसाठी येणाऱ्या वाहनधारकांना पे-अँड-पार्कमध्ये वाहन लावण्याची सक्ती, दुसरीकडे नो-पार्किंगमध्ये वाहन लावल्यास कारवाई आणि आता चक्क दोराने वाहने बांधून ठेवण्याचा प्रकार, यामुळे स्थानक परिसरातील पार्किंग व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
रेल्वे प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन वाहने कोणी आणि कोणत्या अधिकाराने बांधून ठेवली, याचा खुलासा करावा. तसेच अल्पकालीन पार्किंग किंवा पिकअप-ड्रॉपसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
• स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेण्याची मागणी
लासलगाव रेल्वे स्थानकाच्या परिसरात उपलब्ध जागेचा योग्य नियोजनाने वापर करून अल्पकालीन पार्किंग अथवा ‘पिकअप-ड्रॉप झोन’ निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रेल्वे प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकप्रतिनिधींनी याबाबत संयुक्तपणे तोडगा काढण्याची गरज आहे. लासलगाव हे कांदा व्यापाराचे देशपातळीवरील महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या विकासासोबतच वाहन पार्किंगचे नियोजनही प्रवाशांच्या गरजेनुसार करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नातेवाईकांना घ्यायला किंवा सोडायला येणाऱ्या वाहनधारकांसाठी किमान काही वेळ मोफत किंवा नाममात्र शुल्कात वाहन उभे करता येईल अशी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास नागरिकांची मोठी गैरसोय दूर होऊ शकते.
यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.



