Breaking
ब्रेकिंग

योगिराज तुकाराम बाबा गुरुकुल आयोजित आषाढी एकादशी निमित्त भक्तिरसाने न्हालेला भव्य दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

1 1 1 8 9 8

न्यायभूमी 

 निफाड दि.२६ जुलै

(खेडलेझुंगे) आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त योगिराज तुकाराम बाबा गुरुकुल, खेडले झुंगे येथे वारकरी परंपरा, भारतीय संस्कृती आणि भक्तीभावाचा अनुपम संगम घडवून आणणारा भव्य भक्तिमय दिंडी सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

 या दिंडीत गुरुकुलचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक,ग्रामस्थ तसेच खेडलेझुंगे गावातील भजनी मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दिंडीची सुरुवात विधिवत शंख नादाने व विठ्ठल रुक्मिणी व सर्व संतांच्या नाम गजराने झाली. 

 

विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती व योगिराज तुकाराम बाबांची प्रतिमा यांनी सुशोभित पालखी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

 आकर्षक सजविलेल्या ट्रॅक्टरवर संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत मुक्ताबाई यांच्यासह विविध संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थी विराजमान होते.

 विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत सजलेल्या तसेच संतांच्या रूपात अवतरलेल्या विशेषतः केजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस आणि देखण्या सादरीकरणाने सर्व उपस्थितांची मने जिंकली.

तसेच विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध आकर्षक सामाजिक,पर्यावरण व मानव विकास संबंधित फलक सर्वांचे समाजप्रबोधन करत होते.

स्मारक मंदिर – राममंदिर – संतवन – नक्षत्रवन असा दिंडीचा मार्ग होता. टाळ-मृदंगाच्या निनादात, वीणेच्या मंजुळ सुरांत आणि “ज्ञानबा-तुकाराम”, “ज्ञानोबा माऊली तुकाराम”, “विठ्ठल विठ्ठल विठ्ठला”, “विठ्ठल माझा माझा” अशा अखंड नामगजरात विद्यार्थी विठ्ठलनामात तल्लीन होऊन चालत होते. संपूर्ण परिसर “विठ्ठल… विठ्ठल…” या नामघोषाने दुमदुमून गेला आणि भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली.

राममंदिर परिसरात पारंपरिक गोल रिंगण पार पडले. त्यानंतर संतवन मार्गे दिंडी नक्षत्रवनात पोहोचली. अभयवरद हनुमानजींच्या साक्षीने नक्षत्रवनात भव्य गोल रिंगण आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पावली, फुगडी, अभंग आणि वारकरी परंपरेतील विविध भक्तिपर सादरीकरणे करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या मुली, विणेकरी, पालखी, “विठू माझा लेकुरवाळा” या संकल्पनेतून साकारलेले विठ्ठल-रुक्मिणी आणि संतांचा देखणा सहभाग यामुळे दिंडीला पारंपरिक वारीचे जिवंत स्वरूप लाभले.

यावेळी खेडलेझुंगे गावातील भजनी मंडळानेही आपल्या मधुर भजनांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. गुरुकुलचे संस्थापक-संचालक रविंद्र गोरडे, शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ आणि वारकरी भाविकांनी विद्यार्थ्यांसमवेत दिंडीत सहभागी होत या सोहळ्याची शोभा अधिकच वाढविली.

भजने, अभंग, नामसंकीर्तन, पालखी, रिंगण, पावली, फुगडी आणि वारकरी संस्कृतीतील विविध परंपरांचा सुंदर मिलाफ या दिंडी सोहळ्यात अनुभवायला मिळाला. प्रत्यक्ष पंढरपूरची वारी करता आली नसली तरी गुरुकुलच्या या भक्तिमय उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना पंढरीच्या वारीचा आनंद, भक्तीचा उत्सव आणि संस्कारांचा अमूल्य ठेवा अनुभवता आला.

दिंडीची सांगता नक्षत्रवनातील अभयवरद हनुमानजींच्या सान्निध्यात झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना साबुदाणा खिचडी व केळीचा फराळ देण्यात आला.

अत्यंत शिस्तबद्ध, संस्कारमय आणि भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या या दिंडी सोहळ्याने वारकरी परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर कोरले आणि “भक्ती, संस्कार, सेवा आणि समता” हा विठ्ठलाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 1 8 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे