इंधन तुटवडा आणि दरवाढ शेतकऱ्यांना नुकसानकारक:-कृषीतज्ञ,काँग्रेस नेते सचिन होळकर
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
लासलगाव दिनांक २० मे निशिकांत पानसरे
सध्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशामध्ये इंधनाचा तुटवडा तसेच इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे.
सध्याचा काळ हा मशागतीचा काळ असल्याने खरीप हंगामाची पूर्व तयारी सध्या शेतकऱ्यांकडून सुरू आहे.
पुढच्या महिन्यांमध्ये खरीप हंगामाच्या पेरण्या होण्याची शक्यता असल्याने ट्रॅक्टर आणि इतर अवजारांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, मात्र सध्या अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलची उपलब्धता नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
डिझेलचे दर देखील गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे त्यामुळे मशागतीचे देखील दरांमध्ये वाढ झाली आहे आणि यापुढे देखील ते मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या हंगामाला पुरेल इतके डिझेल अथवा इंधन न मिळाल्यास खरीप हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होईल.
डिझेलचे दर वाढल्याने डिझेलचा तसेच रासायनिक खतांचा आणि निविष्ठांचा देखील तुटवडा भासू शकतो रासायनिक खते आणि शेतीचे निविष्ठा महाग होऊ शकतात. युद्धाची सुरुवात होऊन बरेच महिने झाले.
मात्र केंद्र सरकारकडून याबाबत संभाव्य धोका ओळखून कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी केलेली नसल्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. काही राज्यांमधील निवडणुका होईपर्यंत जनतेला अंधारात ठेवण्यात आले आता मात्र इंधन बचतीचा सल्ला दिला आहे.
केंद्र सरकारचे हे ढिसाळ नियोजनाचे लक्षण असल्याचे मत प्रसिद्ध कृषीतज्ञ तसेच नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
इंधन तुटवड्यामुळे आणि इतर बाबींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार हे केंद्र सरकार राहील अशी घणाघाती टीका होळकर यांनी केली.


