Breaking
महाराष्ट्र

लासलगाव बाजार समितीच्या सभापती – उपसभापती निवडीला’ब्रेक’

पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने नाराजी,कारणावरून राजकीय चर्चांना उधाण 

1 0 4 8 9 0

न्यायभूमी

लासलगाव दि.११ जुलै नाशिक जिल्हा प्रतिनिधी कैलास उपाध्ये 

 लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी आज शनिवार दि.११ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली विशेष सभा नाट्यमय घडामोडींमुळे तहकूब करण्यात आली.

निवडणूक निर्णयाधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी,सहाय्यक निबंधक कांतीलाल गायकवाड हे निर्धारित वेळेत सभास्थळीच न पोहोचल्याने निवड प्रक्रिया होऊ शकली नाही.

विशेष म्हणजे,सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही गटांचे सर्व १८ सदस्य सभागृहात उपस्थित असतानाही निवडणूक पुढे ढकलावी लागल्याने बाजार समितीच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे.

         सभापती ज्ञानेश्वर उर्फ डी.के.जगताप व उपसभापती संदीप दरेकर यांनी रोटेशन पद्धतीनुसार कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामे दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदांसाठी आज शनिवार दि.११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा बोलाविण्यात आली होती.

याप्रसंगी ज्ञानेश्वर जगताप,संदीप दरेकर, बाळासाहेब शिरसागर,भीमराज काळे,जयदत्त होळकर,गणेश डोमाडे,छबुराव जाधव,राजेंद्र डोखळे,सोनिया होळकर,सुवर्णा जगताप, डॉ.श्रीकांत आवारे,तानाजी आंधळे,पंढरीनाथ थोरे,महेश पठाडे,राजेंद्र बोरगुडे,प्रवीण कदम, बाळासाहेब दराडे,रमेश पालवे हे सर्व सदस्य सभेस उपस्थित होते.

सत्ताधारी आणि विरोधी गटाचे सदस्य वेळेआधीच सभागृहात दाखल झाले.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतरही निर्णयाधिकारी न आल्याने सदस्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

काही सदस्यांनी सभागृह सोडले,तर विरोधी गटातील सदस्यांनी सचिवांकडून निवडणूक तहकूब झाल्याचे लेखी पत्र घेतल्यानंतरच सभागृहातून बाहेर पडले.

दरम्यान, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांना व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवून प्राधिकृत अधिकारी कांतीलाल गायकवाड यांची अचानक प्रकृती बिघडल्याने ते सभेला उपस्थित राहू शकत नसल्याचे कळविण्यात आले.

त्यामुळे ही सभा तहकूब करण्यात आली असून पुढील तारखेची माहिती स्वतंत्रपणे दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

        या निवडणुकीत अल्पमत – बहुमताच्या गणितामुळे सभापतीपदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यामुळे ऐनवेळी निवडणूक तहकूब झाल्याने राजकीय वर्तुळात तर्क – वितर्कांना उधाण आले आहे.

मोठा पोलिस बंदोबस्त व पत्रकारांना मज्जाव 

      निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती कार्यालय परिसरात पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षकांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

निवडणूक प्रक्रियेचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. यापूर्वीच्या पदाधिकारी निवडणुकांमध्ये पत्रकारांना सभागृहाबाहेर बसून वृत्तसंकलनाची परवानगी दिली जात होती.

मात्र,यावेळी पोलिसांनी कोणालाही प्रवेश न दिल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. प्रसारमाध्यमांना दूर ठेवण्यामागचे कारण काय? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

केवळ बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीसाठी एवढा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची गरज काय होती? अठरा सदस्यांसाठी एवढा पोलीस बंदोबस्त कशासाठी? अवघे १८ सदस्य असताना आधारकार्ड व ओळखपत्रांची तपासणी करण्यात आली.सदस्य काय दंगेखोर आहेत का?

– जयदत्त होळकर

सदस्य,कृषी उत्पन्न बाजार समिती,लासलगाव

• निवडणूक कार्यक्रमानुसार सर्व १८ सदस्य सभागृहात उपस्थित होते.मात्र,निर्धारित वेळेत प्राधिकृत अधिकारी उपस्थित झाले नाहीत. त्यांच्याशी संपर्कही होऊ शकला नाही.

त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्राधिकृत अधिकाऱ्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने ते सभेला उपस्थित राहू शकत नसल्याचे कळविण्यात आले.

त्यामुळे आजची सभा तहकूब करण्यात आली असून पुढील सभेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.

– नरेंद्र वाढवणे

सचिव,कृषी उत्पन्न बाजार समिती,लासलगाव

4/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 4 8 9 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे