लासलगावसह परिसरात गेल्या १० ते १५ दिवसांपासून निर्माण झालेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईची प्रशासनाने गंभीर दखल
गॅस टंचाईवर तहसीलदार विशाल नाईकवाडे मैदानात!
न्यायभूमी
लासलगाव दिनांक २१ ऑक्टोंबर कैलास उपाध्ये
लासलगावसह परिसरात गेल्या १० ते १५ दिवसांपासून निर्माण झालेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
‘न्यायभूमी न्यूज’ने ग्राहकांची गैरसोय आणि गॅस वितरणातील अडचणी मांडल्यानंतर निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी लक्ष घातले असून, स्थानिक पुरवठ्यात अडचण आल्यास येवला आणि मनमाड येथून पर्यायी पुरवठा सुरू ठेवण्याचे स्पष्ट केले आहे.
३० हजार ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न
लासलगावसह निफाड, चांदवड आणि येवला तालुक्यांतील सुमारे ३० हजार ग्राहकांना गॅस टंचाईचा फटका बसत असल्याच्या तक्रारी आहेत.
बुकिंग करूनही सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांची, विशेषतः सणासुदीच्या काळात,मोठी गैरसोय होत आहे. तहसीलदार नाईकवाडे यांनी संबंधित गॅस एजन्सीला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पडताळणी केली असून, ग्राहकांना गॅसअभावी अडचण येऊ नये यासाठी आवश्यक सूचना दिल्याचे सांगितले.
एचपी प्रशासनाचा कारवाईचा इशारा
हिंदुस्थान पेट्रोलियमचे अधिकारी भूपेन पाटील यांनीही या प्रश्नाची दखल घेतली आहे.संबंधित एजन्सीला वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
तसेच, इतर गॅस वितरकांच्या माध्यमातून येत्या दोन ते तीन दिवसांत ग्राहकांना सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. गरजेनुसार सिलिंडरचा साठा वाढविण्याचे नियोजनही करण्यात येणार आहे.
निर्धारित मुदतीत पुरवठा सुरळीत न झाल्यास संबंधित एजन्सीवर दंडात्मक कारवाई करून तिच्याशी संलग्न ग्राहकांचे अन्य एजन्सीकडे हस्तांतरण करण्याची कार्यवाही केली जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे प्रश्नाला वेग
गॅस वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,असा इशारा लासलगाव शहर विकास समितीचे प्रकाश पाटील, संदीप उगले, धर्मेश जाधव, राजेंद्र कराड, चंद्रकांत नेटारे, विकास कोल्हे, शेखर कुलकर्णी, प्रमोद पाटील, उत्तम वाघ, अनिल भावसार, संतोष बोराडे, महेश बकरे, अनिल भागवत आदींसह नागरिकांनी दिला आहे.
आता प्रशासनाच्या आश्वासनांची आणि एचपी प्रशासनाने दिलेल्या मुदतीची अंमलबजावणी किती प्रभावी होते.
याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.



