“रक्षणकर्त्यांना राखी, जीवनदात्यांना राखी — अनोखा रक्षाबंधन सोहळा”
राखी बांधली पोलीस बांधवांना,रक्षण दिलं झाडांना
न्यायभूमी न्युज
खेडलेझुंगे दि १० ऑगस्ट / बाबा गिते

बहीण-भावाच्या प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधन सण यंदा थोडा वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला.
श्री नेताजी सुभाषचंद्र बोस सीबीएससी गुरुकुल,वाहेगाव साळ या शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट लासलगाव पोलिस स्टेशनला भेट देऊन ‘खाकी’ला राखी बांधून अनोखा उपक्रम राबवला.
संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबुराव फकीरराव पवार, सचिव डॉ. वैशालीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम रंगला.
पोलिस स्टेशनच्या आवारात पाऊल टाकताच विद्यार्थ्यांनी उत्साहाने “जय हिंद” चा नारा दिला आणि आपले खरे रक्षक असलेल्या पोलीस बांधवांना अभिवादन केले.
विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या लासलगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नि. भास्करराव शिंदे यांच्यासह सर्व उपस्थिती पोलीस बांधवांना बांधल्या.यावेळी स.पो.नि. भास्करराव शिंदे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी योग्य-अयोग्य वर्तन,स्वतःचं रक्षण करण्याचे मार्ग तसेच पोलीस दलात कसं यावं याबद्दल मोलाचं मार्गदर्शन केलं. हे ऐकून अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पोलीस होण्याची प्रेरणा चमकून गेली.
शाळेच्या पर्यवेक्षिका नीलिमा हिंगमिरे यांनी रक्षाबंधनाची गोष्ट मुलांच्या मनात रुजवली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील झाडांना रक्षासूत्र बांधून “झाडे वाचवा”चा संदेश दिला.
“खाकीच्या सुरक्षेतला विश्वास आणि हिरवाईचं संरक्षण” अशा दुहेरी नात्यांनी हा रक्षाबंधन सण खऱ्या अर्थानं अनोखा ठरला.


