विष्णुनगर (विंचूर) परिसरात दोन दिवसांचा मुसळधार पाऊस – पिकांचे लाखोंचे नुकसान,शेतकऱ्यांची भरपाईची मागणी
न्यायभूमी न्यूज
विंचूर : दि २८ सप्टेंबर अभय पाटील
विष्णुनगर (विंचूर) परिसरात सलग दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शनिवारी दुपार पासून सुरू झालेला पाऊस रविवारी उशिरापर्यंत अखंड सुरू राहिल्याने गावातील नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे शिवारातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.
या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका, कांदा यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी शेतातील सोयाबीन पूर्णपणे गळून पडले आहे,तर मका पूर्णपणे आडवा झाला आहे.
द्राक्ष व डाळिंबाच्या बागाही पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान सोसावे लागणार आहे.
पावसामुळे केवळ शेतीच नव्हे तर रस्त्यांवरही पाणी साचून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.गावाकडील रस्ते तळ्यासारखे दिसत असून शाळकरी मुलांसह नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे.
सलग दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने शेतकरी वर्गाची कंबर मोडली आहे.शेतकरी वर्गामध्ये प्रचंड चिंता व नैराश्याचे वातावरण असून शासनाने तातडीने मदतकार्य राबवले नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरतील,असा इशारा स्थानिक शेतकरी संघटनांनी दिला आहे.
“आम्ही हंगामभर कष्ट करून पिके उभी केली होती. आता दोन दिवसांच्या पावसाने सगळे पाण्यात वाहून गेले. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे.”
“कर्ज काढून मका व सोयाबीन लावली होती. आता पूर्ण पिके पाण्यात बुडाल्याने कर्ज कसं फेडायचं? सरकारने तातडीने मदत केली नाही तर आम्ही उभं राहू शकणार नाही.”
प्रतिक्रिया शेतकरी :- सूर्यभान घायाळ
“पावसामुळे द्राक्ष बागा पूर्णपणे पाण्यात गेल्या आहेत. फळांची गुणवत्ता बिघडेल,उत्पादनावर परिणाम होईल.लाखोंचे नुकसान झाले आहे.”
सरकारने तातडीने मदत केली नाही तर आम्ही उभं राहू शकणार नाही.”
प्रतिक्रिया शेतकरी:- ज्ञानेश्वर देसले