Breaking
कृषीवार्ता

निफाड तालुक्यात युरिया टंचाई केव्हा हटणार?

आठ दिवसांत शेतकऱ्यांना मुबलक युरिया मिळाला नाही तर संबंधित कृषी कार्यालयात युरिया ओतणार; माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांचा इशारा

1 1 4 7 3 9

न्यायभूमी 

 लासलगाव दि.०२ ऑगस्ट निशिकांत पानसरे

निफाड तालुक्यात खरीप हंगामाच्या मध्यावर युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रांमधून युरिया मिळत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे.

अनेक ठिकाणी दुकानदारांकडून युरिया संपला असे सांगितले जात असताना दुसरीकडे विष्णुनगर येथे तब्बल ८८ लाख ३६ हजार ६२४ रुपयांचा युरियाचा साठा पोलिसांनी जप्त केल्याची कारवाई समोर आली आहे.

या घटनेमुळे कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार केला जात असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.

       खरीप हंगामात मका,सोयाबीन,भात,ऊस, भाजीपाला आदी पिकांना सध्या युरियाची अत्यंत गरज असताना शेतकऱ्यांना एका गोणीसाठी अनेक फेऱ्या माराव्या लागत आहेत.

काही ठिकाणी युरिया देताना इतर महागडी खते किंवा कृषी उत्पादने घेण्याची सक्ती म्हणजेच ‘लिंकिंग’ केल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी राज्यातील इतर जिल्ह्यांतही समोर आल्या असून प्रशासनाने यापूर्वी अशा अनियमितींवर कारवाई केली आहे.

दरम्यान,विष्णुनगर येथील कारवाईत मोठ्या प्रमाणात अनुदानित युरियाचा साठा जप्त झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शेतकऱ्यांना युरिया मिळत नसताना एवढा मोठा साठा नेमका कुठून आला? हा साठा किती दिवसांपासून जमा केला जात होता? या काळाबाजारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? संबंधित पुरवठा साखळीची चौकशी होणार का? अशा प्रश्नांची उत्तरे आता शेतकरी मागत आहेत.

राज्य सरकारने युरियाचा साठा,विक्री आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी नियम केले असले तरी प्रत्यक्षात अनेक भागांत उपलब्धता आणि वितरणाबाबत तक्रारी कायम आहेत.

केंद्र सरकार राष्ट्रीय स्तरावर खतांचा पुरेसा साठा असल्याचा दावा करत असले,तरी स्थानिक पातळीवर वितरणातील अडचणी आणि गैरप्रकारांमुळे शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याचे विविध अहवालांत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कृषी विभागाने तातडीने तालुक्यातील सर्व खत विक्रेत्यांची अचानक तपासणी करून प्रत्यक्ष साठा, पीओएस मशीनवरील नोंदी आणि विक्रीची पडताळणी करावी.

लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी तसेच युरियाचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. आता प्रशासन या इशाऱ्यानंतर कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

याप्रकरणी माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की,पुढील आठ दिवसांत निफाड तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध झाला नाही, तर शेतकऱ्यांसह संबंधित कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन युरिया ओतून तीव्र आंदोलन करण्यात येईल. शेतकऱ्यांची लूट आणि कृत्रिम टंचाई आम्ही सहन करणार नाही.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 4 7 3 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे