वाढदिवसानिमित्त वात्सल्य वृद्धाश्रमात अन्नदान; उद्योजक तथा पत्रकार रोशन गव्हाणे यांचा प्रेरणादायी उपक्रम
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
नाशिक दि.१६ जून (प्रतिनिधी)

वाढदिवस हा केवळ केक कापून, महागड्या हॉटेलमध्ये पार्टी करून साजरा करण्याचा दिवस नसून समाजाप्रती आपली काहीतरी जबाबदारी आहे.
या भावनेतून उद्योजक तथा पत्रकार रोशन गव्हाणे यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबक रोड येथील वात्सल्य वृद्धाश्रमात वृद्धांसाठी एक वेळच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले.
“भुके को अन्न,प्यासे को पानी” या मानवतावादी विचाराला अनुसरून राबविण्यात आलेला हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला भावला.
वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत वेळ घालवत त्यांना प्रेमाने भोजन देण्यात आले. यामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला.
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण वाढदिवसानिमित्त मोठ्या पार्ट्या,महागडे डेकोरेशन आणि दिखाऊ खर्च करतात.
मात्र, त्याऐवजी गरजू, निराधार आणि वृद्ध व्यक्तींसाठी अन्नदान किंवा मदतीचा हात पुढे केल्यास त्यातून मिळणारे समाधान अधिक मोलाचे असते.
वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबीयांची उणीव भासत असते.अशा वेळी त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा केल्याने त्यांना आपुलकीची भावना मिळते आणि त्यांचे मनापासून आशीर्वादही लाभतात.
उद्योजक तसेच पत्रकारिता क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटविणारे रोशन गव्हाणे यांनी या माध्यमातून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
विशेषतः तरुणांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
याप्रसंगी विजय बागुल, बंटी भाऊ घुले, प्रेमपियुष लोखंडे आणि कृष्णा बोरसे यांची उपस्थिती लाभली.
उपस्थितांनी रोशन गव्हाणे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत,अशा प्रकारचे उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
रोशन गव्हाणे म्हणाले, “समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो.वाढदिवसासारख्या आनंदाच्या क्षणी गरजूंना मदत केल्यास त्यातून मिळणारे समाधान वेगळेच असते.तरुणांनीही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, हीच अपेक्षा आहे.”
वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आलेला हा अन्नदानाचा उपक्रम समाजात संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव वाढविणारा ठरला असून,रोशन गव्हाणे यांनी घालून दिलेला हा आदर्श निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.