मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात निफाड तालुक्यातील हनुमाननगरची जिल्ह्यात उत्तुंग भरारी!
निफाड तालुक्यातील ग्रामपंचायत हनुमाननगरचा नाशिक जिल्ह्यात द्वितीय क्रमांक; अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सांघिक प्रयत्नांना यशाची मोहोर!

न्यायभूमी
हनुमाननगर |दिनांक ०९ नोव्हेंबर
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाचे नियोजन, अधिकारी-कर्मचाऱ्यांची मेहनत आणि ग्रामस्थांचा सक्रिय लोकसहभाग यांचा सुरेख संगम घडला, तर विकासाची नवी दिशा निर्माण होऊ शकते, याचा प्रत्यय निफाड तालुक्यातील मौजे हनुमाननगर ग्रामपंचायतीने दिला आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत हनुमाननगर ग्रामपंचायतीने नाशिक जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे हनुमाननगरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून गावाच्या विकासाभिमुख वाटचालीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रशासनाचे मार्गदर्शन आणि नियोजन ठरले यशाचा भक्कम पाया
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री. ओमकारजी पवार (IAS), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्रीमती वर्षाजी फडोळ आणि निफाडच्या गटविकास अधिकारी श्रीमती नम्रताजी जगताप यांनी केलेले मोलाचे मार्गदर्शन, योग्य नियोजन आणि वेळोवेळी केलेले सहकार्य यामुळे हे यश साध्य झाले.

तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. सुनीलजी पाटील, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. राजेंद्रजी बोरसे, श्री. राजेशजी थोरात, कै. श्री. संजयजी पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कोशिरे, मुख्य सेविका श्रीमती खांदोडे तसेच विविध विभागांच्या प्रमुखांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
ग्रामपंचायत प्रशासनाची समन्वयपूर्ण भूमिका

ग्रामपंचायत हनुमाननगरचे प्रशासक श्री. ज्ञानेश्वरजी शिंपी, ग्रामपंचायत अधिकारी श्री. किरण क्षीरसागर यांनी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच निफाड तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष श्री. स्वप्निल कुंदे, सचिव श्री. अतुल आढाव आणि तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी सभासदांचे सहकार्य लाभले.
ग्रामस्थांचा सहभाग ठरला अभियानाचा खरा आधार

या अभियानाच्या यशामध्ये केवळ शासकीय यंत्रणेचेच नव्हे, तर संपूर्ण गावाच्या एकजुटीचे मोठे योगदान आहे. गावातील माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, भजनी मंडळ, तरुण मित्रमंडळे, महिला भगिनी आणि बचत गट यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
याशिवाय पोलीस पाटील श्री. अमोल गुंजाळ, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. अशोक दरेकर व श्री. सागर गुंजाळ, संगणक परिचालक श्री. पवन देवकर, ग्रामरोजगार सेवक श्री. ज्ञानेश्वर भडांगे, ग्राम महसूल अधिकारी श्री. युवराज गोटम, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. राजेंद्र शिंदे, न्यायभुमी न्यूज चे मुख्य संपादक पत्रकार श्री. दत्तात्रय दरेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. योगेश शेळके, मुख्याध्यापक श्री. खंडेराव साबळे, शिक्षिका श्रीमती घोडेकर, अंगणवाडी सेविका श्रीमती संगीता ठुबे व श्रीमती चंद्रकला जगताप, मदतनीस श्रीमती शकुंतला ठुबे व श्रीमती सुशीला ठुबे, आशा सेविका सौ. चित्रा ठुबे, आरोग्य सेवक श्री. आदित्य संत, आरोग्य सेविका श्रीमती थोरात, सीआरपी व गटप्रवर्तक सौ. मनीषा कडलग, कोषाध्यक्ष सौ. सोनाली गुंजाळ, ग्रामसंघ अध्यक्ष श्रीमती आशा ठुबे, वायरमन श्री. शुभम तांबट, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. शिंदे, वृक्षसंवर्धक श्रीमती सत्यभामा बर्डे व श्रीमती मंगला काळे यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

सुशासनापासून सामाजिक विकासापर्यंत सात महत्त्वाच्या घटकांवर भर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत हनुमाननगरमध्ये विविध विकासात्मक घटकांवर नियोजनबद्ध कामकाज करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींवर भर देण्यात आला.
1. सुशासनयुक्त पंचायत : सुसज्ज व सुविधायुक्त ग्रामपंचायत कार्यालय, पारदर्शक प्रशासकीय कामकाज आणि नागरिकाभिमुख सेवा.
2. सक्षम पंचायत : ग्रामपंचायतीच्या पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय क्षमता बळकट करणे.
3. गावपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण : ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, महिला बचत गट आणि विविध ग्रामस्तरीय संस्थांचा विकास.
4. जलसमृद्ध व हरित गाव : जलस्रोतांचे बळकटीकरण, वृक्षलागवड, जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धन.
5. मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण : विविध शासकीय योजनांचा समन्वय साधून विकासकामांना गती.
6. उपजीविका व सामाजिक विकास : महिला व शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि सामाजिक सुविधा.
7. नाविन्यपूर्ण उपक्रम : गावाच्या गरजांनुसार आधुनिक, पर्यावरणपूरक आणि लोकहिताचे उपक्रम.
शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास
अभियानाच्या कालावधीत गावात सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य मंदिर, सुसज्ज स्मशानभूमी, क्रीडांगण, खुली व्यायामशाळा व बंदिस्त व्यायामशाळा अशा विविध सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला.
धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण, नाना-नानी पार्क, औषधी वनस्पती उद्यान, परसबाग, अभ्यासिका आणि महिला भवन यांसारख्या उपक्रमांतून गावातील सामाजिक व सांस्कृतिक जीवन अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जलसंधारण आणि स्वच्छतेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गावाची निर्मिती
गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी विहीर, सिमेंट बंधारे, नदी-नाल्यांतील जलस्रोतांचे बळकटीकरण, जलशुद्धीकरण यंत्राद्वारे शुद्ध पाणीपुरवठा, प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग यांसारख्या कामांना प्राधान्य देण्यात आले.
त्याचबरोबर धोबीघाट, भूमिगत गटारे, शोषखड्डे, कंपोस्ट व गांडूळ खत खड्डे, कचऱ्याचे विलगीकरण, सौरऊर्जेचा वापर आणि सांडपाणी व्यवस्थापन अशा पर्यावरणपूरक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.
आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि रोजगारनिर्मितीलाही प्राधान्य
गावातील नागरिकांना आयुष्मान भारत व आभा कार्डचे वाटप करून वैद्यकीय लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात आला. दिव्यांग बांधवांना UDID कार्ड व वैद्यकीय सेवा, पात्र लाभार्थ्यांची घरकुल बांधकामे पूर्ण करणे, शेत-पानंद रस्त्यांची दुरुस्ती, महिला व शेतकरी बचत गटांची स्थापना आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या कामांनाही प्राधान्य देण्यात आले.
याशिवाय श्रमदानातून स्वच्छता मोहीम, वृक्षलागवड, रस्ते दुरुस्ती, शोषखड्ड्यांची निर्मिती अशा विविध लोकसहभागात्मक उपक्रमांमधून गावाच्या विकासाला चालना देण्यात आली.
सांघिक प्रयत्नांतून आदर्श गावाकडे वाटचाल
अभियानाच्या माध्यमातून हनुमाननगरने केवळ जिल्हास्तरीय यश संपादन केले नाही, तर ग्रामविकासासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम केल्यास गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो, हेही सिद्ध केले आहे. प्रत्येक घटकाचा सहभाग, विविध विभागांचा समन्वय, विकासकामांचे नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांमुळे हनुमाननगर गावाने आदर्श गावाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
सर्वांच्या सांघिक यशाचे ग्रामपंचायतीकडून कौतुक
ग्रामपंचायत हनुमाननगरचे प्रशासक श्री. ज्ञानेश्वर शिंपी साहेब आणि विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी श्री. ज्ञानेश्वर साळुंके यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्तरीय संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
हनुमाननगरचा जिल्ह्यातील द्वितीय क्रमांक हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संस्थेचा विजय नसून संपूर्ण गावाच्या एकजुटीचा, परिश्रमांचा आणि विकासाच्या सामूहिक संकल्पाचा गौरव आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या हनुमाननगर ग्रामपंचायतीचे तसेच गावातील सर्व नागरिकांचे हार्दिक अभिनंदन!




