लासलगाव पोलीस आणि कृषी विभागाची धडक कारवाई तब्बल ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त
विंचूरमध्ये अनुदानित खताचा मोठा काळाबाजार उघडकीस!

न्यायभूमी
नाशिक ( लासलगाव ) दि.०२ ऑगस्ट कैलास उपाध्ये जिल्हा प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे.शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानित युरिया खताचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा लासलगाव पोलीस आणि कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे.
विष्णुनगर परिसरात टाकलेल्या धाडीत पोलिसांनी तब्बल ८८ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अत्यंत स्वस्त दरात मिळणाऱ्या अनुदानित युरियाची हेराफेरी करून तो औद्योगिक वापरासाठी महागड्या दरात विकण्याचा मोठा डाव रचण्यात आला होता.
१ ऑगस्ट रोजी विष्णुनगर येथील ‘हॉटेल न्यू क्रांती’च्या पाठीमागे असलेल्या एका कांद्याच्या खळ्यात हा प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली.
माहिती मिळताच कृषी अधिकारी संदीप मोगल आणि लासलगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने त्या ठिकाणी अचानक छापा टाकला.
छाप्यादरम्यान आरोपी ज्ञानेश्वर दगु पवार आणि सागर किशोर गरड (दोघे रा. विंचूर) हे संगणमत करून सरकारी युरियाच्या गोण्यांमधील खत काढून ‘टेक्निकल ग्रेड युरिया’च्या इंडस्ट्रियल गोण्यांमध्ये भरताना रंगेहात पकडले गेले.
पोलीस आणि कृषी विभागाने या कारवाईत:
२६४ गोण्या अनुदानित आरसीएफ भारत युरिया (किंमत ₹७०,२२४/-)
४६४ गोण्या इंडस्ट्रियल युरिया (किंमत ₹११,६०,०००/-)
२५ लाखांचा आयशर टेम्पो आणि ५० लाखांचा टाटा ट्रक
गोण्या शिवण्याचे मशीन आणि सॅमसंग S-24 Ultra सह १ लाखाचे ३ महागडे मोबाईल
असा एकूण ८८ लाख ३६ हजार ६२४ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम,खत नियंत्रण आदेश आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंके करत असून, शेतकऱ्यांच्या खताचा काळाबाजार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे.



