निफाड तालुक्यातील धारणगांव खडक येथील आदिवासी कुटुंबाच्या झोपड्या जळून खाक सविस्तर वृत्त
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील, मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि ०२ एप्रिल :- मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील आदिवासी कुटुंबाच्या चार झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.

सुदैवाने चार वर्षीय बालिकेला वाचविण्यात यश आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धारणगांव खडक येथील अकरावड ह्या ठिकाणी दि.१ एप्रिल दुपारी १२.१० वाजेच्या सुमारास ३६ केव्ही विद्युत तारेच्या शॉटसर्किटने बापु चंद्रभान माळी, नंदु गंगाराम सोनवणे यांच्या झोपड्यांना आग लागून घरातील धान्य, किराणा, भांडे, कागदपत्रे, मोटसायकल, फवारणी पंप, दागिने तसेच इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
आग लागताच लगतच्या वसंत जाधव, बाबासाहेब जाधव यांनी द्राक्षेबागेच्या फवारणी यंत्राने आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने ७ ते ८ झोपड्या आगीपासून वाचल्या.
नंदू सोनवणे यांनी प्रसंगावधान दाखवत चार वर्षांची मुलगी व गॅस टाकी काढल्याने जीवितहानी टळली, मात्र यात ते जखमी झाले.

संपूर्ण संसार बेचिराख झाल्याने सदर कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले आहेत. घटनेची माहिती कळताच माजी मंत्री छगन भुजबळ यांचे सहाय्यक बाळासाहेब लोखंडे व लोंढे यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीची प्रत्येकी ५ हजार रुपये आर्थिक मदत दिली.
एकलव्य संघटनेचे रामेश्वर माळी, तलाठी गणेश जगताप, ग्रामविकास अधिकारी अतुल आढाव, पोलिस पाटील राहुल सोनवणे, पोलीस हवा.बाळासाहेब कांदळकर, ज्ञानेश्वर सानप, महावितरणच्या सहाय्यक अभियंता गोसावी मॅडम यांनी भेट देऊन पंचनामा केला. प्रत्येकी १ लाख १० रुपये नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले.
■ पोलिसांच्या माणुसकीचे असेही दर्शन
आदिवासी कुटुंबांचा सर्वच संसार बेचिराख झाल्यानंतर तेथील नागरिकांच्या फक्त अंगावरील कपडे राहिले हे बघून पोलिसांचे देखील मन हेलावले.

लासलगाव पोलीस ठाण्याचे पो.ना.आर.एस.घुमरे, ज्ञानेश्वर सानप यांनी तातडीने तेथील महिलांना साड्या व चोळी देऊन मदत केली.
इच्छुक व्यक्तींनी मदतीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी मा.गिते यांच्याशी संपर्क करावा अथवा
९६६५०३४३०६ या फोन पे वर मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.




