शिवसेना नेते राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने खोदलेल्या रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन
न्यायभूमी
चादवड दि.२८ मार्च
चांदवड शहरातील वरचे गाव, पंचशील नगर, बागवानपुरा येथे तत्काळ नवीन रस्ता बांधण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना नेते राजभाऊ आहिरे यांच्या वतीने खोदलेल्या रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले व यांना निवेदन देण्यात आले.
चांदवड शहरातील वरचे गाव, पंचशील नगर, बागवानपुरा येथे मागील दोन महिन्यांपासून नगरपरिषदेने रस्ता खोदून ठेवला असल्याने येथे नागरिकांना चालण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. नगरपरिषदेच्या ठेकेदाराने नवीन रस्त्याचे काम सुरू करायचे आहे असे जनतेला सांगून रस्ता पूर्णपणे खोदून ठेवला आहे.
यामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय व दुरावस्था झालेली आहे. रस्त्यातील दगड वरती आलेले आहेत. नागरिकांना चालण्यासाठी चांगला रस्ता नाही. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात वाढलेले आहेत.
या रस्त्यावरील चेंबर व चेंबरचे ढापे वर आले असल्याने दुचाकी चालक आपली गाडी घेऊन पडत आहेत.
तसेच चारचाकी वाहन चालकांना रस्त्यातील मोठमोठ्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थी व वयोवृद्ध लोक ठेच लागून रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पडत आहेत.
नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताच्या काही निधीखाऊ लोकांनी शहरातील जनतेला वेठीस धरून व जनतेला जाणीव करून देत रस्त्याची कामे करत आहेत. हा रस्ता रहदारीचा प्रमुख मार्ग असल्याने येथे लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
नागरिकांना चालायला रस्ता नसल्यामुळे चालणे कठीण झाले असून,छोटे-मोठे अपघातांमध्ये लोकांचे हात-पाय फ्रॅक्चर होत आहेत तसेच कमरेचे व पाठीचे मणके निकामी होत आहेत. लोकांची गैरसोय होत असल्याने नागरिकांमध्ये अत्यंत संतप्ततेचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथे राहणाऱ्या रहिवाशांना रस्त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.पायी चालणाऱ्या लोकांना या रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
अनेक वेळा नागरिकांनी नगरपरिषदेकडे अर्ज केले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवलेला असून, तो दुरुस्त करण्याबाबत वारंवार मागणी करूनही नगरपरिषदे कडून उडवाउडवीची उत्तरे देऊन नागरिकांना परत पाठवण्यात येत आहे.
रस्ता नसल्यामुळे येथील लोक त्रस्त झालेले आहेत. हा रस्ता अंदाजे एक ते दीड फूट खोल खोदून ठेवलेला आहे, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महिलांना बाजारासाठी लांबून ये-जा करावी लागत आहे. मागील दोन महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवलेला असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती, गुढीपाडवा हिंदू नववर्ष शोभायात्रा तसेच रामनवमी हे सण उत्साहात साजरे झाले; मात्र रस्ता खोदून ठेवलेला असल्याने या मार्गावरून रथ नेता आले नाहीत. तसेच रमजान ईदसारखे अनेक सण-उत्सवही पार पडले, तरीही अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे.
पुढील महिन्यात दि. १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने हा रस्ता रथाचा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे तात्काळ या रस्त्याचे काम पूर्ण करून नवीन रस्ता तयार करण्यात यावा.
अन्यथा शिवसेना नेते राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.
यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीत प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला.
यावेळी येथील रहिवाशी व कार्यकर्ते उपस्थित होते.