लग्नानंतर छळ,पैशांसाठी मारहाण व घराबाहेर काढल्याचा आरोप;पती,सासू,नणंद व नंदईविरुद्ध गुन्हा
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
नासिक जिल्हा दि.०६ जुलै प्रतिनिधी कैलास उपाध्ये
लग्नानंतर मानसिक व शारीरिक छळ करून माहेरहून वारंवार पैसे आणण्याची मागणी करत मारहाण केल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात पती,सासू, नणंद आणि नंदईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रेरणा आशुतोष सोनवणे (वय २४, रा. सध्या गुंजाळवाडी,ता.निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह १४ मे २०२५ रोजी सुरेगाव (वेळापूर),ता.कोपरगाव येथील आशुतोष ज्ञानेश्वर सोनवणे यांच्याशी हिंदू रीती रिवाजानुसार मोठ्या थाटामाटात झाला होता.
लग्नासाठी माहेरच्या नातेवाईकांनी सुमारे २० लाख रुपये खर्च करून संसारोपयोगी साहित्य, फर्निचर तसेच पतीला तीन तोळ्यांची सोन्याची साखळी व अंगठी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
लग्नानंतर सुरुवातीला काही दिवस सर्व काही सुरळीत होते.मात्र त्यानंतर पती व सासूकडून “काम येत नाही,स्वयंपाक करता येत नाही” अशा कारणांवरून वारंवार अपमान करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पती संभाजीनगर येथे सरकारी रुग्णालयात कार्यरत असल्याने ते घरी क्वचितच येत असत.घरी आल्यानंतरही ते फिर्यादीशी संवाद टाळत असून पती म्हणून कोणतेही सहकार्य किंवा वैवाहिक जीवनातील जबाबदारी पार पाडत नसल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीनुसार, सासू निर्मला सोनवणे या वारंवार माहेरकडून पैसे आणण्याचा तगादा लावत होत्या.पतीच्या कर्जफेडीसाठी प्रथम ५० हजार रुपये आणि नंतर एक लाख रुपयांची आर्थिक मदत माहेरकडून देण्यात आली.
मात्र ही रक्कम परत करण्यात आली नसल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. तसेच लग्नातील सोन्याचे दागिने वापरण्यास न देता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
यानंतर पतीसोबत संभाजीनगर येथे वास्तव्यास गेल्यानंतरही त्रास सुरूच राहिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. पती उशिरा घरी येत, कारण विचारल्यास मारहाण करून धमकावत असल्याचा आरोप आहे. किडनी स्टोनचा त्रास असतानाही उपचारासाठी रुग्णालयात न नेता एकटे सोडून गेल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणात अनेकदा नातेवाईक व मध्यस्थांच्या उपस्थितीत समेटाचे प्रयत्न करण्यात आले.मात्र परिस्थितीत सुधारणा झाली नाही.उलट नणंद तेजश्री लासुरे आणि नंदई भागचंद लासुरे यांनीही पतीची बाजू घेत फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये सासरी झालेल्या बैठकीत पतीने सर्वांसमोर “ती मला आवडत नाही. ५० हजार रुपये आणल्याशिवाय तिला नांदवणार नाही,” असे सांगितले. फिर्यादीने पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर पती, सासू, नणंद व नंदई यांनी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली आणि “पैसे घेऊन ये,तरच घरात ये,” असे म्हणत घराबाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यानंतर फिर्यादी माहेरी आली. त्यांनी दिनांक ९ मार्च २०२६ रोजी महिला दक्षता विभाग, नाशिक येथे तक्रार दाखल केली होती. तेथेही समेटाचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने अखेर लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
या प्रकरणी आरोपी आशुतोष ज्ञानेश्वर सोनवणे,निर्मला ज्ञानेश्वर सोनवणे (रा.सुरेगाव, ता.कोपरगाव),तेजश्री भागचंद लासुरे व भागचंद परशराम लासुरे (रा.पारेगाव रोड,ता.येवला) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ८५,११५(२),३५२, ३५२(२), ३५२(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानेश्वर दिनकर जाधव करीत आहेत.



