विष्णुनगर (ता.निफाड) येथे हरित गाव घडवण्याचा सामूहिक संकल्प
भव्य वृक्षारोपण सोहळ्याची जोरदार तयारी
न्यायभूमी
विंचूर दिनांक.०६ जुलै मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

विष्णूनगर (ता. निफाड):- येथे पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून ग्रामस्थांनी एकत्र येत “हरित गाव घडवण्याचा सामूहिक संकल्प” केला आहे.या संकल्पामुळे गावात वृक्षारोपण चळवळीला नवी ऊर्जा मिळाली असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.
रविवार, १२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमाचा उद्देश केवळ झाडे लावणे नसून पुढील पिढ्यांसाठी शुद्ध हवा, सावली, फळे आणि सुरक्षित जीवनाची पायाभरणी करणे हा आहे.“आज लावलेले प्रत्येक रोपटे उद्याच्या जीवनाचा आधार ठरणार आहे,” या जाणिवेतून ग्रामस्थ मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होत आहेत.
या उपक्रमाची संकल्पना श्री.रामकृष्ण मोतीराम घायाळ सर यांनी मांडली असून ग्रामस्थ,युवक, महिला आणि विविध सामाजिक घटकांच्या सहभागातून हा सोहळा भव्य स्वरूपात पार पडणार आहे.झाडे लावणे ही केवळ औपचारिकता नसून निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा एक सामूहिक प्रयत्न आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. भास्कर भगरे सर (दिंडोरी लोकसभा, खासदार) तर प्रमुख अतिथी म्हणून मा. गोकुळ गीते (महाराष्ट्र विधान परिषद, आमदार) उपस्थित राहणार आहेत.
तसेच शशिकांत मंगरुळे (निफाड, प्रांत अधिकारी), विशाल नाईकवाडे (निफाड, तहसीलदार), नम्रता जगताप (निफाड, गटविकास अधिकारी), सागर कोते (लासलगाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक), नितीन लालसरे (महाराष्ट्र, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी), राजेश थोरात (निफाड, विस्ताराधिकारी), सुनील शिंदे (निफाड, ग्रामविकास अधिकारी), विजय गरुड (निफाड ग्रामविकास अधिकारी ) तसेच निफाड पंचायत समिती येथील माजी सभापती व माजी सदस्य, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, पोलीस विभाग, पंचायत राज विभाग, कृषी विभागातील अधिकारी आणि परिसरातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
तसेच परिसरातील पोलीस पाटील,परिसरातील ग्रामपंचायत येथील माजी सरपंच,माजी उपसरपंच व माजी सदस्य,विंचूर कार्यकारी सोसायटीचे चेअरमन,व्हा.चेअरमन व सदस्य, तसेच पत्रकार बांधव यांनीही या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विष्णुनगर ग्रामस्थांनी केले आहे.
“एक रोपटं… एक श्वास… आणि हरित उद्याची सुरुवात” या भावनिक संदेशातून ग्रामस्थांनी सर्व नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.



