लासलगाव येथील जितेंद्र ओधवजी चोथानी यांच्या मालकीच्या लासलगाव विंचूर रोड येथील एसएस मोबाईल दुकानाच्या शेजारील बारदान गोडावूनला भीषण आग
लासलगाव येथे अग्निशमन दलाची गाडी ग्रामपंचायत किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीने घ्यावी अशी चर्चा
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि २९ ऑक्टोंबर
प्रतिनिधी बाबा गिते / निशिकांत पानसरे
लासलगाव येथील जितेंद्र ओधवजी चोथानी यांच्या मालकीच्या लासलगाव विंचूर रोड येथील एसएस मोबाईल दुकानाच्या शेजारील बारदान गोडावूनला भीषण आग लागली.
ही आग लागल्याचे सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास बंद शटर च्या आतून धुराचे लोट बाहेर आल्यानंतर नागरिकांच्या लक्ष्यात आले.
आग लागल्याची बातमी पसरताच लासलगाव मधील शेकडो नागरिकांनी बंद शटर तोडण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले.
बंद शटर तुटल्यानंतर लागलेल्या आगीवर पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला.
यावेळी ग्रामपंचायत लासलगाव चे टँकर आणि छोट्या बुम, छोट्या गाड्यांच्या माध्यमातून पाणी व्यवसाय करणारे आणि डी के नाना यांचे पाण्याचे टँकरने सुरवातीला पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न सुरु असताना रात्री ८-८.३० वाजेच्या सुमारास चांदवड,येवला आणि पिंपळगाव बसवंत, मनमाड येथील अग्निशमन दलाची गाड्यानी आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु झाले.
आग कशाने लागली हे अजून निश्चित झाले नाही. आग लागली त्यावेळेस चोथानी यांचे कुटुंबीय गोडाऊनच्या वरच्या मजल्यावर हजर होते.
आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. लागलेल्या आगीमध्ये प्राथमिक दर्शी कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी लाखोंचे नुकसान झालेले आहे.
यावेळी लासलगाव येथे अग्निशमन दलाची गाडी नसल्याने छोट्या आगीचे रूपांतर मोठ्या आगीत होत असते.
वेळीवर अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध होत नसल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याची चर्चा नागरिक करत होते.
लासलगाव येथे अग्निशमन दलाची गाडी ग्रामपंचायत किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीने घ्यावी अशी चर्चा झाली.
रात्री ९ वाजेच्या सुमारास आमदार पंकज भुजबळ यांनी भेट दिली. यावेळी नागरिकांनी लासलगाव मध्ये अग्निशमन दलाची यंत्रणा नसल्याने मोठ्याप्रमाणावर रोष व्यक्त केला. यावेळी आमदार पंकज भुजबळ यांनी अग्निशमन दलाच्या गाडीसाठी तात्काळ प्रस्ताव पाठविण्यात यावा अशा सूचना केल्या. आचार संहिता संपल्यावर याबाबत तात्काळ पूर्तता करण्यात येईल असे आश्वासित केले.
आग लागल्याची बातमी कळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे हे टीम सह घटनास्थळी तात्काळ हजर होऊन मदत कार्य सुरु केले.
मोठ्या दुकानदार यांनी आपले नुकसान होऊ नये म्हणून आपल्या दुकानाचे आणि गोडाऊनचे फायर सेफ्टी यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे असे सहाय्य्क पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी सांगितले.