नाशिकच्या साहिल पारखची बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील एलिट कॅम्पसाठी निवड
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

न्यायभूमी न्यूज
नासिक दि १४ मार्च मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
नाशिक जिल्हा क्रिकेटसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा युवा खेळाडू, आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील राष्ट्रीय एलिट कॅम्पसाठी निवड झाली आहे.
हा कॅम्प नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA), बेंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत २ ते २८ एप्रिल या कालावधीत आयोजित केला जाणार आहे. भारतभर विविध ठिकाणी होणाऱ्या या शिबिरात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एकूण सहा खेळाडूंचा समावेश आहे. साहिल पारख व योगेश चव्हाण हे दोघे पुदुचेरी येथे “टीम सी” मध्ये सहभागी होणार आहेत.
साहिल पारख याने सप्टेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या १९ वर्षांखालील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना, आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
या सामन्यात साहिलने ७५ चेंडूत नाबाद १०९ धावा (१४ चौकार, ५ षटकार) फटकावून भारतीय संघाला केवळ २२ षटकांत ९ गडी राखून विजय मिळवून दिला होता. त्याच्या या जबरदस्त प्रदर्शनामुळे त्याची बीसीसीआयच्या विनू मंकड स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली होती.
साहिलची यापूर्वीही सलग दोन हंगाम NCA बेंगळुरू तर्फे होणाऱ्या शिबिरासाठी निवड झाली होती. राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची तिसऱ्यांदा निवड झाली आहे. २०२३-२४ च्या हंगामात इंदोर येथे झालेल्या बीसीसीआयच्या विनू मंकड करंडक स्पर्धेत साहिलने ९ डावांत २ शतके व १ अर्धशतक झळकावत ३६६ धावा फटकावल्या, ज्यामुळे त्याची १९ वर्षांखालील एकदिवसीय चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया D संघात निवड झाली होती.
साहिल पारखच्या या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे, तसेच प्रशिक्षक व पदाधिकाऱ्यांनी साहिलचे अभिनंदन करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
साहिल पारखच्या या निवडी मुळे आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी नाशिककरांची उत्सुकता वाढली आहे!