भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती नूतन विद्यालयात खडक माळेगाव येथे उत्साहात साजरी
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
कोटमगाव दि १४ एप्रिल विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर
नूतन विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रायते एम. बी. होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर श्री. परदेशी आर. एम. यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन परिचयावर आधारित सविस्तर माहिती दिली.
त्यांनी डॉ. आंबेडकर यांचे शिक्षण, समाजसुधारणेतील कार्य, संविधान निर्मितीतले योगदान आणि त्यांच्या सामाजिक विचारांची प्रेरणा यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले.
कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केला. त्यांच्या विचारांवर आधारित कविता, भाषण आणि घोषवाक्यांनी वातावरण भारावून गेले.
विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. थोरात एस. जी., कदम आर. पी., ढोमसे के. सी. यांनीही आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या कार्याची महती विशद केली. त्यांच्या विचारांचा आजच्या पिढीसाठी असलेला संदेश त्यांनी प्रभावीपणे मांडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या विद्यार्थिनी आकांक्षा रायते, पूजा राजोळे व समृद्धी कुशारे यांनी अत्यंत नेटकेपणाने केले. त्यांना श्री. मदगे पी. डी. यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास विद्यालयातील पर्यवेक्षक श्री बोरसे एन आर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी संविधान पूजन करून आणि बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहचवण्यात विद्यालय यशस्वी ठरले.


