अफवांवर विश्वास ठेवू नका; इंधन पुरवठा सुरळीत तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचे आवाहन
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
निफाड : दि.२५ मार्च
तालुक्यातील नागरिकांनी पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.
सध्या इंधनाचा पुरवठा सुरळीत असून कोणत्याही प्रकारची कमतरता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनेकदा सोशल मीडियावर येणाऱ्या अप्रमाणित संदेशांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.परिणामी,पेट्रोल पंपांवर अचानक मोठ्या प्रमाणात गर्दी होते व विनाकारण रांगा लागतात.
या परिस्थितीमुळे खरोखर गरज असलेल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अफवांपासून दूर राहून संयम राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तहसीलदार नाईकवाडे यांनी सांगितले की, इंधनाचा साठा पुरेसा असून पुरवठा साखळीत कोणताही अडथळा नाही.
जिल्हा प्रशासन तसेच तेल कंपन्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.नागरिकांनी सोशल मीडियावर येणाऱ्या संदेशांची खातरजमा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये,असेही त्यांनी नमूद केले.
तसेच विनाकारण साठा करण्याच्या उद्देशाने पेट्रोल पंपांवर गर्दी टाळावी.अशा गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असते.
तालुक्यातील नागरिकांनी शांतता राखत प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.

