Breaking
महाराष्ट्र

लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांना रोख पेमेंट मिळावे ; शहर विकास समितीचे मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन

लासलगाव प्रतिनिधी कैलास उपाध्ये

1 1 8 3 0 7

न्यायभूमी 

लासलगाव दि.१० ऑगस्ट 

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडते व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात देण्यासाठी आपल्या स्तरावरून आवश्यक आदेश करण्यात यावेत.

या मागणीचे निवेदन लासलगाव शहर विकास समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री मा. ना. गिरीश महाजन यांना देण्यात आले.

     निवेदनात शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार रोख व ऑनलाइन अशा दोन्ही पेमेंट पद्धतींचा कायदेशीर व व्यवहार्य पर्याय उपलब्ध करून द्यावा, तसेच कोणत्याही आडते किंवा व्यापाऱ्याकडून विशिष्ट पेमेंट पद्धती स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव किंवा सक्ती केली जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. लासलगाव बाजार समिती ही कांदा खरेदी-विक्रीसाठी देशभरात प्रसिद्ध असून नाशिक जिल्ह्यासह परिसरातील हजारो शेतकरी येथे शेतमाल विक्रीसाठी येतात.

शेतमाल विक्रीनंतर बियाणे, खते, कीटकनाशके, पेट्रोल-डिझेल, शेती औजारे, किराणा तसेच वाहतूक खर्चासाठी शेतकऱ्यांना अनेकदा त्याच दिवशी पैशांची आवश्यकता असते. मात्र ऑनलाइन पेमेंट उशिराने किंवा दुसऱ्या दिवशी खात्यावर जमा झाल्यास शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

लागू शासकीय व कायदेशीर नियमांचा विचार करून शेतमाल विक्रीनंतर सुमारे १० ते १५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोख स्वरूपात व उर्वरित रक्कम ऑनलाइन पद्धतीने देण्याची व्यवहार्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी समितीने केली आहे.

तसेच शेतकरी, व्यापारी, मजूर, वाहतूकदार व स्थानिक व्यावसायिकांची संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नावर सर्वमान्य तोडगा काढावा, लासलगाव व परिसरातील इतर बाजार समित्यांमधील शेतमाल आवकेचा तुलनात्मक अभ्यास करावा आणि शेतकरी इतर बाजारपेठांकडे वळत असल्यास त्यामागील कारणांचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा, अशी मागणीही करण्यात आली.

     लासलगाव बाजार समिती ही केवळ शेतमाल खरेदी-विक्रीचे ठिकाण नसून शेतकरी, व्यापारी, हमाल, वाहतूकदार व स्थानिक व्यावसायिकांच्या उपजीविकेचे प्रमुख आर्थिक केंद्र आहे. त्यामुळे शेतकरी हिताचा, पारदर्शक, व्यवहार्य व कायदेशीर निर्णय घेऊन लासलगाव बाजारपेठेची विश्वासार्हता व आवक कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.

     यावेळी लासलगाव शहर विकास समितीचे प्रकाश पाटील, राजेंद्र कराड, संदीप उगले, प्रमोद पाटील, चंद्रकांत नेटारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

    निवेदनाच्या प्रती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. ना. श्री. छगनरावजी भुजबळ, पणन व राजशिष्टाचार मंत्री मा. ना. श्री. जयकुमारजी रावल, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक, जिल्हाधिकारी नाशिक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था निफाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, लासलगाव पोलीस स्टेशन, तसेच सभापती व सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव आणि अध्यक्ष, मर्चंट असोसिएशन, लासलगाव यांना देण्यात आल्या.

4/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 8 3 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे