Breaking
महाराष्ट्र

देवगाव–धानोरे–धारणगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य!

वाहनचालकांची कसरत; शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल – प्रशासनाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे का?

1 3 7 1 9 4

न्यायभूमी 

विंचूर दिनांक १५ नोव्हेंबर 

येवला–लासलगाव विधानसभा मतदारसंघातील देवगाव–धानोरे–धारणगाव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असलेल्या या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखे झाले आहे.

या रस्त्याचा फटका शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांना बसत आहे. शेतीमालाची वाहतूक करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, दुचाकीस्वारांसाठी खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत.

विशेषतः रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.

लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे!

ग्रामीण भागातील रस्ते ही मूलभूत सुविधा असताना देवगाव–धानोरे–धारणगाव मार्गाची दुरवस्था कायम का? संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने खड्डे बुजवावेत आणि केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा!

धानोरे येथील ग्रामस्थ अशोक गुजर यांनी सांगितले की, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होत असून शेतीमालाची वाहतूक करणेही कठीण झाले आहे. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती न केल्यास देवगाव व धानोरे ग्रामस्थांच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल.

 

देवगावचे ग्रामस्थ रवींद्र तासकर यांनीही रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. मोटारसायकल चालविणेही कठीण झाले असून, शेतीमालाची वाहतूक, रुग्णांना दवाखान्यात नेणे आणि विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवताना मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आता तरी प्रशासन जागे होणार का?

रस्त्याची दुरुस्ती होण्यासाठी आणखी किती दिवस नागरिकांनी प्रतीक्षा करायची? मोठी दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित यंत्रणा जागी होणार का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, हीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 7 1 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे