विंचूर बनले उत्तर महाराष्ट्राचे ‘डेअरी हब’; अन्न व औषध प्रशासनाकडून दूध व्यावसायिकांना ‘FoSTaC’ प्रशिक्षण
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
लासलगाव दि.३१ मार्च महेश साळुंके

निफाड तालुक्यातील विंचूर आणि परिसरातील गावे सध्या दुग्ध व्यवसायात मोठी भरारी घेत असून,हे क्षेत्र एक प्रमुख ‘डेअरी हब’म्हणून उदयास येत आहे.
या पार्श्वभूमीवर,ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित दूध मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्या वतीने विंचूर येथे डेअरी चालक आणि दूध संकलन केंद्र चालकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी दूध संकलनाबाबतची शासकीय नियमावली सविस्तरपणे समजावून सांगतानाच, संकलनापासून वितरणापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता आणि नियमांचे पालन करणे कसे अनिवार्य आहे.
यावर प्रकाश टाकला.तसेच अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील यांनीही उपस्थित दूध व्यावसायिकांना अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
फूड सेफ्टी ट्रेनर वृषाली दुबे यांनी उपस्थित सर्व डेअरी चालकांना ‘FoSTaC’ (Food Safety Training and Certification) अंतर्गत विशेष तांत्रिक प्रशिक्षण दिले. दुधाची हाताळणी करताना घ्यावयाची काळजी, स्वच्छता आणि जागतिक दर्जाचे अन्न सुरक्षेचे निकष यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
गुणवत्तेच्या स्पर्धेत विंचूरची आघाडी: कुमार चव्हाण वाढत्या स्पर्धेच्या युगात गुणवत्तेचे महत्त्व अधोरेखित करताना स्थानिक डेअरी चालक कुमार चव्हाण यांनी चर्चेत सहभाग घेतला. ते म्हणाले की,”विंचूर परिसर डेअरी हब म्हणून विकसित होत असताना वाढती स्पर्धा लक्षात घेता आपल्याला गुणवत्तेवर विशेष भर द्यावा लागेल.
प्रशासनाने दिलेल्या या प्रशिक्षणामुळे आणि मार्गदर्शनामुळे आम्हाला जागतिक दर्जाची मानके पाळण्यास निश्चितच मदत होईल.”
यावेळी विंचूर व परिसरातील प्रमुख दूध व्यावसायिक गणेश जाधव, शाम मुक्कू, शामराव गुजर, नितीन चव्हाण यांच्यासह सर्व डेअरी चालक आणि संकलन केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासनाच्या या पुढाकारामुळे विंचूर परिसरातील दुग्ध व्यवसायाला अधिक व्यावसायिक स्वरूप प्राप्त होणार असून ग्राहकांचा विश्वास वाढण्यास मदत होणार आहे.

