अल्पवयीन मुलीची रस्त्यात अडवणूक करत छेड काढल्या प्रकरणी एकास तीन वर्ष सक्तमजुरी सविस्तर वृत्त
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी न्यूज
नासिक दि ०२ एप्रिल :-
घराकडे परतणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या आरोपात संदिप कारभारी गायकवाड रा.औरंगपुर,ता.निफाड यांस निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.बी.डी.पवार यांनी दोषी ठरवत तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
दि.६ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ७ वा सुमारास १३ वर्षीय पिडीत मुलगी आपल्या नातेवाईक अल्पवयीन मुलीसोबत औरंगपुर ते हिवरगांव रस्त्याने स्कुटी वर बेघर वस्तीकडे परतत होत्या.
त्यावेळी संदिप कारभारी गायकवाड याने रस्त्यात गाडी अडवुन पिडितेचा हात पकडुन अश्लील भाषेत बोलत छेडछाड केली होती.
याबाबत पिडितेने सायखेडा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन, भा.दं.वि.कलम ३५४ ए, ३४१,बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
तपासानंतर निफाडचे जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
या खटल्यात सरकारी अभियोक्ता ॲड.सुषमा बंगले यांनी पिडित, तपास अधिकारी घनश्याम तांबे यांचेसह एकुण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवून प्रभावी युक्तीवाद केला.
कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन म.पो.शि.निकिता सानप यांनी काम पाहिले.
न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्यात आरोपी संदिप कारभारी गायकवाड याचे वरील आरोप सिध्द झाले.
न्यायालयाने भा.दं.वि.कलम ३५४ ए अन्वये तीन वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने कारावास, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८ अन्वये ३ वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने कारावास,बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम १२ अन्वये २ वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास,भा.दं.वि कलम ३४१ अन्वये १
महिना साधा कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ७ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.