रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन व नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण इशारा सविस्तर वृत्त
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
चांदवड दि १८ फेब्रुवारी
चांदवड शहरातील डॉ .बाबासाहेब आंबेडकर नगर व शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने दि. 17 फेब्रुवारी 2025, सोमवार रोजी नगरपरिषद मुख्यधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
चांदवड शहरात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये मागील पंधरा ते वीस वर्षांपासून लोकांना चालायला रस्ते नाहीत. रस्तांमध्ये मोठ – मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे पायी चालणाऱ्या लोकांना व दुचाकी चालकांना रस्त्यावरून चालताना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
‘या रस्त्यांवरून चालायचे कसे?’, हा प्रश्न जनतेला निर्माण झालेला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शहरात छोट्या- मोठ्या अपघातांचे प्रमाण देखील वाढलेले आहे. या अपघातांमध्ये अनेक लोकांचे पाठीचे मणके निकामी झालेले आहेत व काहींचे हात – पाय फ्रॅक्चर देखील झाले आहेत व काही लोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
विद्यार्थ्यांनी विद्यार्थी व वयोवृद्ध लोकांना पायी चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. वृद्ध लोक, महिला व लहान मुले रस्त्यावरून चालताना रस्त्यावरील खड्ड्यांत पडत आहेत व जखमी होत आहेत. गल्लो – गल्लींमध्ये सुद्धा चांगले रस्ते नसल्याने महिलांना पाण्याचे हंडे घेऊन चालता येत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील गटार पूर्णपणे तुटलेल्या आहेत. या गटार 30 ते 40 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या होत्या. या गटारांचा आकार अतिशय लहान आहे. या गटारांतुन सांडपाणी देखील पास होत नाही. या गटारांत बोगदे पडले आहेत.
गटार नसल्याने घाणेरडे सांडपाणी लोकांच्या घरासमोर येत आहे. गटार नसल्याने येथे अनेक समस्या उद्भवत आहेत. टॉयलेट टाकीचे घाणेरडे सांडपाणी देखील या लोकांच्या घरासमोर येत आहे. सांडपाण्यातील जंतु व किटक रस्त्यावर येत आहेत. यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झालेला आहे. सर्वत्र रोगराई व दुर्गंधी पसरलेली आहे.
नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळेच लोकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चांदवड शहरातील सर्व रस्ते विकासकामांच्या नावाखाली फोडून ठेवण्यात आलेले आहेत. यामुळे सर्वत्र धुळीचे प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
मुख्याधिकारी व त्यांचे संगनमताचे ठेकेदार व इंजिनिअर यांनी मागील 10 ते 15 वर्षांपासून विकास कामांच्या नावाने मोठ्या प्रमाणात शासकीय निधी लाटलेला आहे व निधी लाटण्याचे काम अध्यापही चालू आहे. यामुळे जनता अतिशय त्रस्त झालेली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व चांदवड शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था अधिकाऱ्यांनी केलेली आहे. शहरात लोकांना चालायला देखील चांगले रस्ते नसल्याने लोकांमध्ये अतिशय तणावाचे व संतप्तेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
येत्या आठ ते दहा दिवसांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये चांगल्या क्वालिटीचे रस्ते व गटार बांधण्यात यावेत. काही ठिकाणी अंडरग्राउंड गटार व काही गटारांवर ढापे टाकण्यात यावेत. काही गल्लींत गट्टू बसविण्यात यावेत.
इलेक्ट्रिकल पोल किंवा सौरर्जेवर चालणारे पोल बसवण्यात यावेत. तसेच, *दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत चांदवड शहरासाठी शासनाकडून किती निधी मंजूर करण्यात आला व यापैकी किती निधी कुठे खर्च करण्यात आला.
याची माहिती शहरात जाहीर फलक लावून जनतेला तपशीलवर माहिती कळविण्यात यावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व चांदवड शहरात लवकरात – लवकर नवीन व चांगल्या क्वालिटीचे रस्ते व गटार बांधण्यात यावेत.
अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन व नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल.
यानंतर कायदा सुव्यवस्थतेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आलेला आहे.