५ बचत गटांना २५ लाखांच्या कर्जाचे वाटप;’सक्षम व्हा’असा दिला तज्ज्ञांनी मंत्र
लासलगाव ग्रामपंचायतीत अनिष्ट प्रथांना मूठमाती; ३२४ 'एकल महिलां'चा हळदी-कुंकू लावून सन्मान

न्यायभूमी
लासलगाव दि.१८ जानेवारी (प्रतिनिधी): निशिकांत पानसरे

समाजातील विधवा,परित्यक्ता आणि घटस्फोटीत महिलांना मानाचे स्थान मिळावे आणि वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनिष्ट प्रथांना मूठमाती मिळावी,या उद्देशाने लासलगाव ग्रामपंचायतीत ‘एकल महिला सन्मान’ व हळदी-कुंकू सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून आणि गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात ३२४ एकल महिलांनी सहभाग नोंदवून सामाजिक बदलाची नांदी दिली.
अनिष्ट प्रथांना फाटा पतीच्या निधनानंतर पत्नीचे जोडवे काढणे,मंगळसूत्र काढणे किंवा कुंकू पुसणे यांसारख्या अमानवी प्रथा बंद करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे.

गावातील सांस्कृतिक कार्यक्रमांत एकल महिलांना सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला.
यावेळी उपस्थित महिलांना हळदी-कुंकू लावून आणि सन्मानपूर्वक ‘वाण’ देऊन गौरविण्यात आले.
आरोग्य आणि सक्षमीकरणावर भर ग्रामपंचायत अधिकारी वर्षा जेजुरकर यांनी महिलांना आरोग्य आणि सामाजिक विषयांवर मार्गदर्शन केले. “मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्याबाबतचे गैरसमज दूर व्हायला हवेत. महिलांनी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
डॉ.कल्पना जगताप यांनीही विविध आजारांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. सरपंच योगिता पाटील व वेदिका होळकर यांनी शासकीय योजनांची माहिती देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे आवाहन केले.
बचत गटांना २५ लाखांचे कर्ज वाटप महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र बँकेच्या माध्यमातून पाच बचत गटांना एकूण २५ लाख रुपयांच्या कर्जाचे धनादेश देण्यात आले. यात प्रामुख्याने:
• अगस्त ऋषी बचत गट: ८ लाख रुपये
• कृषी कन्या व रेणुका माता गट: प्रत्येकी ५ लाख रुपये
• संविधान बचत गट: ४ लाख रुपये
• पीर बाबा बचत गट: ३ लाख रुपये
उपस्थित मान्यवर यावेळी व्यासपीठावर सरपंच योगिता पाटील,महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा वेदिका होळकर, अमिता ब्रम्हेचा,पुष्पा आहिरे,डॉ.कल्पना जगताप,बँकेचे शाखाधिकारी मधुकर बावस्कर, ग्रामविकास अधिकारी संजय बाविस्कर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका,आशा सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सायंकाळी झालेल्या गाण्यांच्या मैफिलीने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.



