‘डायल ११२’ वर खोटा कॉल; धारणगाव वीरच्या तरुणावर गुन्हा अत्यावश्यक सेवेचा गैरवापर; लासलगाव पोलिसांची कारवाई
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
नाशिक जिल्हा ( शिरवाडे वाकद) दि.१७ जुलै कैलास उपाध्ये
धारणगाव वीर (ता. निफाड) येथील एका व्यक्तीने दारूच्या नशेत ‘डायल ११२’ या अत्यावश्यक सेवा क्रमांकावर खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी संबंधिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारणगाव वीर येथील अस्लम समशेरुद्दीन शेख (वय ३३) याने दिनांक १६ जुलै रोजी ‘डायल ११२’ या अत्यावश्यक सेवेवर कॉल करून खोटी माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तो दारूच्या नशेत आढळून आला.
परिसरातील साक्षीदारांकडे चौकशी केली असता संबंधिताने पोलिसांना जाणीवपूर्वक खोटी माहिती देत अत्यावश्यक सेवेचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत तो मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१३/२०२६ दाखल करण्यात आला.
भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २१७ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ च्या कलम ८५(१) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
याच कारवाईदरम्यान दारूच्या नशेत वाहन चालविताना आढळलेल्या दोन दुचाकीस्वारांविरुद्धही गुन्हा क्रमांक २१२/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ८५(१) अंतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम. तसेच निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार, पोलीस हवालदार कांदाळकर, पोलीस शिपाई गणेश नागरे व घोलप यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कांदाळकर करीत आहेत.


