पत्नीने प्रियकर व मेव्हण्याच्या मदतीने पतीचा खून; उगाव येथील बेपत्ता युवक प्रकरणाचा उलगडा
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
नासिक दि.११ मार्च बाबा गीते
उगाव (ता. निफाड) येथील बेपत्ता युवक शादाब रज्जाक तांबोळी (वय ३०) याच्या खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने करत पत्नी, प्रियकर व मेव्हण्यासह सात जणांना अटक केली आहे. दागिन्यांच्या व्यवहाराचा बनाव करून युवकाला मनमाड येथे नेऊन त्याचे हात-पाय बांधून खून करून मृतदेह नदीत फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी उगाव परिसरातून शादाब रज्जाक तांबोळी हा बेपत्ता झाल्याची तक्रार निफाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.त्यानुसार मनुष्य मिसिंग रजिस्टर क्र. १८/२०२६ प्रमाणे नोंद करण्यात आली होती.
दरम्यान दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी चांदवड तालुक्यातील परसुल गावच्या शिवारातील परसुली-चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात एका इसमाचा मृतदेह आढळून आला.
अज्ञात आरोपींनी त्या इसमाचे दोन्ही हात नायलॉनच्या दोरीने बांधून,तोंडाला कपडा बांधून तसेच कमरेला व मांडीला दोरीने डंबेल्स बार बांधून नदीत फेकून दिल्याचे आढळून आले.
त्यामुळे चांदवड पोलीस ठाण्यात गुरनं ७५/२०२६ भा.न्या. सं. कलम १०३ (१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासात मृत व्यक्ती ही निफाड पोलीस ठाण्यातील मिसिंगमधील युवक शादाब तांबोळी असल्याचे स्पष्ट झाले.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर,अपर पोलीस अधीक्षक (मालेगाव) तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा,चांदवड व निफाड पोलीसांनी तपास सुरू केला.
उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन,उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेन्सिक, फिंगरप्रिंट व श्वान पथकाच्या मदतीने घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.
तपासादरम्यान मयताची पत्नी मुस्कान शादाब तांबोळी हिचे ऋषभ मनोज वर्मा (रा. मनमाड) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. दोघांना लग्न करायचे असल्याने त्यांनी मयताचा मेव्हणा शाहरूख शफिक शेख याच्यासह इतर साथीदारांच्या मदतीने कट रचला.
सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहाराचा बहाणा करून शादाब तांबोळी याला मनमाड-मालेगाव रोडवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर बोलावण्यात आले.
तेथे त्याचे हात-पाय नायलॉनच्या दोरीने बांधून व तोंडाला कपडा बांधून त्याचा खून करण्यात आला.
त्यानंतर मृतदेहाला डंबेल्स बार बांधून चांदवड-निफाड रोडवरील परसुल शिवारातील नदीच्या पुलाखाली पाण्यात फेकून दिल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी ऋषभ मनोज वर्मा (वय २३, रा. चांदवड रोड, मनमाड),शाहरूख शफिक शेख (वय २१, रा. मालेगाव नाका,मनमाड – मयताचा मेव्हणा), युवराज विजय थोरात (वय १९, रा. भीमनगर, मालेगाव),सलीम साबीर शेख (वय २८, रा. आझादनगर, मालेगाव), आर्यन सुंदर जिनवाल (वय १९, रा. भीमनगर, मालेगाव),शेख एजाज शेख रियाज (वय २९, रा. आंबेडकर नगर, मनमाड) मुस्कान शादाब तांबोळी (वय २४, रा.उगाव, ता. निफाड – मयताची पत्नी) या आरोपींना चांदवड पोलीस ठाण्यातील दाखल खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या पथकाकडून सुरू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर,चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ,निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्यासह सपोनि नितीन रणदिवे,पोउनि प्रकाश भालेराव, सपोउनि नवनाथ सानप,पोहवा सुधाकर बागुल, प्रशांत पाटील,हेमंत गिलबिले,श्रीकांत गारुंगे, ज्ञानेश्वर सानप,सचिन वराडे,विशाल गोसावी, संदीप राठोड,प्रदीप बहिरम,नितीन गांगुर्डे, प्रविण गांगुर्डे,किशोर बोडके आदींच्या पथकाने केली.