Breaking
ब्रेकिंग

२५ वर्षांचे नेतृत्व आणि मंत्रिपद, तरी विंचूर-लासलगावसह परिसराचे प्रश्न ‘जैसे थे’! विकास नेमका कुठे अडकला

आरोग्य आणि पाणीपुरवठ्याचे प्रश्न कायम; विंचूरला स्वतंत्र आरोग्य केंद्राची प्रतीक्षा, सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या जुन्या पाइपलाइनचा प्रश्न ऐरणीवर!

1 3 7 1 9 4

न्यायभूमी 

विंचूर दिनांक १४ नोव्हेंबर

येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या सुमारे २५ वर्षांपासून मंत्री छगन भुजबळ यांचे नेतृत्व कायम राहिले आहे. या कालावधीत मतदारसंघात विविध विकासकामे झाली. काही रस्त्यांची कामे चांगल्या पद्धतीने मार्गी लागली, दळणवळणाच्या सुविधांमध्ये सुधारणा झाली, तर काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पही पुढे आले. मात्र विकासाचा हा प्रवास केवळ रस्ते आणि पायाभूत सुविधांपुरता मर्यादित राहिला आहे का? रोजगार, आरोग्य आणि पाणीपुरवठ्यासारखे सामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडित प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटले आहेत का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

 

विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती, भूमिपूजन आणि उद्घाटनाचे कार्यक्रम नव्हेत. सामान्य माणसाला रोजगार मिळणे, गावातच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणे, नियमित पाणीपुरवठा होणे आणि तरुणांना रोजगारासाठी दुसऱ्या शहरात स्थलांतर करावे लागू नये, हाही विकासाचा महत्त्वाचा भाग आहे.

या निकषांवर येवला-लासलगावसह परिसराच्या विकासाचा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

 

मतदारसंघात गेल्या काही वर्षांत रस्त्यांची अनेक कामे झाली असून काही भागांतील दळणवळण सुधारले आहे. मात्र या विकासाबरोबर स्थानिक तरुणांना किती रोजगार उपलब्ध झाला, किती नवीन उद्योग आले आणि किती कंपन्यांनी स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य दिले, याचा हिशेब जनतेसमोर येणे गरजेचे आहे.

येवला-लासलगाव-विंचूर परिसरात औद्योगिक विकासाच्या मोठ्या संधी असताना स्थानिक तरुणांना रोजगारासाठी नाशिक, पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरकडे जावे लागत असेल, तर औद्योगिक विकासाचा फायदा नेमका किती स्थानिक तरुणांना झाला, हा प्रश्न उपस्थित होतो.

 

गेल्या २५ वर्षांत किती नवीन उद्योग सुरू झाले? किती स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या? किती रोजगारनिर्मिती झाली? याची आकडेवारी लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

विंचूरला स्वतंत्र आरोग्य केंद्र कधी मिळणार?

 

आरोग्य हा सामान्य माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. विंचूर हे झपाट्याने वाढणारे गाव असून परिसरात औद्योगिक वसाहत, कांदा बाजारपेठ आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. लोकसंख्या आणि नागरिकांच्या गरजा वाढत असताना विंचूरमध्ये स्वतंत्र शासकीय आरोग्य केंद्राची मागणी अद्याप कायम आहे.

 

आजारी रुग्णांना उपचारासाठी लासलगाव किंवा निफाड येथे जावे लागते. रात्रीच्या वेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांची मोठी धावपळ होते. एवढ्या वर्षांच्या राजकीय नेतृत्वानंतरही विंचूरला स्वतंत्र आरोग्य केंद्र का मिळाले नाही? आरोग्य सुविधांचा विस्तार कधी होणार? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

 

सोळा गाव पाणीपुरवठा योजना; निधी मंजूर, तरी नागरिकांना दिलासा कधी?

 

लासलगाव-विंचूरसह सोळा गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. सन २०१० पासून कार्यान्वित असलेल्या या योजनेच्या जुन्या पाइपलाइनमुळे अनेक ठिकाणी गळती आणि दुरुस्तीच्या समस्या निर्माण झाल्याचे यापूर्वीही वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

 

या योजनेच्या नूतनीकरणासाठी २० कोटी १० लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती २०२२ मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर २०२५ मध्ये योजनेचा वीजखर्च कमी करण्यासाठी सहा कोटी रुपयांच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी निधी मंजूर झाल्याचेही वृत्त आले होते.

 

मात्र आजही जुन्या पाइपलाइन फुटणे, पाणीपुरवठा विस्कळीत होणे आणि वारंवार दुरुस्ती करावी लागणे अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. मग इतका निधी मंजूर होऊनही नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठ्याची हमी का मिळत नाही? नवीन पाइपलाइनची किती कामे पूर्ण झाली? उर्वरित कामे कधी पूर्ण होणार? योजनेच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.

 

विकासकामांच्या निविदा आणि ठेकेदारीतील पारदर्शकतेचा मुद्दा

 

मतदारसंघात गेल्या २५ वर्षांत झालेल्या विविध विकासकामांच्या निविदा आणि ठेकेदारी प्रक्रियेबाबतही पारदर्शकतेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. स्थानिक सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि नवीन ठेकेदारांना किती संधी मिळाल्या? निविदा प्रक्रिया किती पारदर्शक होती? मंजूर निधी आणि प्रत्यक्ष खर्च किती झाला? याची माहिती सार्वजनिक झाल्यास विकासकामांचा वस्तुनिष्ठ आढावा घेता येईल.

 

हा कोणावरही आरोप करण्याचा विषय नसून सार्वजनिक पैशातून होणाऱ्या कामांचा हिशेब जनतेला मिळण्याचा विषय आहे.

 

 

मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात काही मोठे प्रकल्प आणि पायाभूत सुविधांची कामे झाली आहेत. काही रस्त्यांमुळे नागरिकांचा प्रवासही सुलभ झाला आहे. मात्र विकासाचे मूल्यमापन केवळ झालेल्या कामांच्या संख्येवर न करता त्याचा सामान्य नागरिकांच्या जीवनावर झालेला परिणाम तपासणे अधिक महत्त्वाचे आहे.

 

 काही रस्ते झाले, पण रोजगार किती वाढला? निधी मंजूर झाला, पण पाणी नियमित मिळते का? विंचूरला स्वतंत्र आरोग्य केंद्र कधी मिळणार? तरुणांना गावातच रोजगार मिळतो का? शेतकऱ्यांच्या सिंचनाचे प्रश्न किती सुटले? या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे.

 

येवला-लासलगावसह परिसरात गेल्या २५ वर्षांत नेमका कोणता विकास झाला? कोणत्या गावाला काय मिळाले? कोणत्या गावाचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत? विंचूर आणि लासलगावच्या नागरिकांना आजही पाणी, आरोग्य आणि रोजगारासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर विकासाच्या दाव्यांचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे.

 

लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असो, जनतेने त्याला निवडून दिल्यानंतर त्याच्याकडून विकासाचा हिशेब मागण्याचा अधिकार नागरिकांना आहे.

कारण विकास हा केवळ जाहिरातींमध्ये, भाषणांमध्ये किंवा भूमिपूजनाच्या फलकांवर दिसणारा नसावा; तो सामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचणाऱ्या पाण्यात, तरुणांच्या हाताला मिळणाऱ्या कामात आणि रुग्णाला वेळेवर मिळणाऱ्या उपचारांतून दिसला पाहिजे!

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 7 1 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे