नाशिकमध्ये सात लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसमाला पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

न्यायभूमी
नाशिक जिल्हा दिनांक ०६ नोव्हेंबर कैलास उपाध्ये
वीजचोरीच्या कारवाईत दंडाची रक्कम कमी करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे सात लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारणाऱ्या खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नाशिक पथकाने गुरुवारी (दि.५ नोव्हेंबर) रंगेहात पकडले. शिवाजी खंडेराव शिंदे (वय ४८, रा. वाहेगाव, ता. चांदवड, जि. नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय ५९, व्यवसाय व्यापार) यांच्या शेतात पीपी बॉयलर या नावाने एन्व्हायर्नमेंट कंट्रोल सिस्टिमचा पोल्ट्री फार्म आहे. दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी विद्युत भवन, नाशिक येथील भरारी पथकाने त्यांच्या पोल्ट्री फार्मवरील वीजजोडणीची तपासणी केली होती.
यावेळी मीटरमध्ये दोन केबल दिसत असल्याचे सांगून मीटरव्यतिरिक्त अतिरिक्त विजेचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात पाच लाख रुपये दंड आणि तीन लाख रुपये रोख, असे एकूण आठ लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच, मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधणाऱ्या व्यक्तीकडे पैसे देण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर शिवाजी शिंदे यांनी तक्रारदाराशी संपर्क साधून पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तक्रारदाराने दि. ४ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार त्याच दिवशी सायंकाळी ५.३८ ते ६.४९ या वेळेत पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी खासगी इसम शिवाजी शिंदे यांनी विद्युत भवन, बिटको पॉइंट, नाशिकरोड येथील कार्यालयाबाहेर तक्रारदाराला बोलावून भरारी पथकातील तिवारी साहेब दंडाची जी रक्कम आकारतील, ती कमी करून देण्याच्या मोबदल्यात सात लाख रुपयांची लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानंतर गुरुवारी (दि. ५ नोव्हेंबर) विद्युत भवन, बिटको पॉइंट, नाशिकरोड येथील कार्यालयाबाहेर पंचांसमक्ष तक्रारदाराकडून सात लाख रुपयांची लाच स्वीकारताना शिवाजी शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाणे, नाशिक शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी केले. सापळा पथकात पोलीस हवालदार संदीप हांडगे, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण, पोलीस हवालदार प्रभाकर गवळी आणि पोलीस हवालदार किरण धुळे यांचा समावेश होता.
या कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती असल्यास किंवा लोकसेवकाकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.




