SIR प्रक्रियेविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक;बागलाणमध्ये तहसीलदारांना निवेदन

न्यायभूमी
सटाणा : दि. २८ ऑक्टोबर :
SIR (विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण) प्रक्रियेच्या विरोधात व केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विशाल मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत बागलाण तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नायब तहसीलदार मोंढे यांना निवेदन देण्यात आले.
मतदार यादीतील अनियमितता तपासण्याची मागणी
SIR प्रक्रियेदरम्यान पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांकडे निवेदनातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नावांची आणि त्यामागील कारणांची कायदेशीर प्रक्रियेनुसार तपासणी करावी. पात्र मतदारांना हरकत नोंदविण्याची, नावात दुरुस्ती करण्याची तसेच अपील करण्याची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनातील प्रमुख मागण्या
१. SIR प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नावांची आणि त्यामागील कारणांची तपासणी करावी.
२. पात्र मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेनुसार आवश्यक संधी व दिलासा द्यावा.
३. मतदार यादीतील संभाव्य दुबार नोंदी, चुकीच्या नोंदी आणि अनधिकृत बदलांची निष्पक्ष चौकशी करावी.
४. मतदानाच्या आकडेवारीतील कथित विसंगती आणि निवडणूक प्रक्रियेतील संभाव्य अनियमिततांची अधिकृत नोंदी व पुराव्यांच्या आधारे तपासणी करावी.
५. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मांडण्यात आलेल्या तक्रारी व आरोपांची चौकशी सक्षम आणि स्वतंत्र प्राधिकरणामार्फत कायदेशीर प्रक्रियेनुसार करावी.
६. संबंधित निवडणूक नोंदी, मतदानाची आकडेवारी, उपलब्ध CCTV व वेबकास्ट नोंदी आणि इतर कागदपत्रे नियमानुसार सुरक्षित ठेवावीत.
७. चौकशीत अनियमितता किंवा कायद्याचे उल्लंघन सिद्ध झाल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करावी.
८. निवेदनावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी.
बागलाण तालुका वंचित बहुजन आघाडीचा सहभाग
या निवेदनाद्वारे मतदार यादीची अचूकता, पात्र नागरिकांचा मतदानाचा अधिकार आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी संबंधित तक्रारींची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मांडण्यात आली.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे महासचिव दादा खरे, उपाध्यक्ष निलेश देवरे, प्रसिद्धी प्रमुख संदीप गांगुर्डे, विजय अहिरे, सुनील वणीस, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम यांच्यासह अन्य कार्यकर्ते यांच्या सह्या होत्या.



