लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा; आमरण उपोषणाची सांगता रोख चुकवतीबाबत व्यापारी वर्गाकडून सकारात्मक प्रतिसाद
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडले

न्यायभूमी
लासलगाव दि.११ सप्टेंबर प्रतिनिधी कैलास उपाध्ये
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरुद्ध जनआंदोलन न्यास निफाड तालुका, लासलगाव शहर विकास समिती आणि शेतकऱ्यांच्या वतीने गुरुवार, दि. १० सप्टेंबरपासून बाजार समिती कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाची आज शुक्रवार दि.११ सप्टेंबर २०२६ रोजी सांगता करण्यात आली. बाजार समिती प्रशासनाने व्यापारी वर्गाशी चर्चा करून रोख चुकवतीसह विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर माजी खासदार समीर भुजबळ, तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले. त्यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू-पाणी देऊन उपोषण सोडविण्यात आले.
शेतमाल विक्रीनंतर चुकवतीची रक्कम तातडीने मिळावी, कायदे व नियमांच्या चौकटीत रोख चुकवतीची व्यवहार्य व्यवस्था करावी, स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, बाहेरगावच्या शेतकऱ्यांसाठी निवास व्यवस्था करावी, वाहनांना आगमनक्रमानुसार रांग लावावी, पारदर्शक लिलाव व्यवस्था करावी, वजनमापातील वादांवर नियंत्रण ठेवावे तसेच नाशवंत शेतीमालाची चुकवती तातडीने करावी, अशा १३ प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. या मागण्यांसंदर्भात लासलगाव शहर विकास आघाडीने दि. ४ सप्टेंबर रोजी बाजार समितीकडे संयुक्त निवेदन दिले होते. त्यानंतर अपेक्षित कार्यवाही न झाल्याने दि. १० सप्टेंबरपासून आघाडीचे प्रकाश पाटील, उत्तम जगताप, रवी होळकर, संदीप उगले, राजेंद्र कडाड, धर्मेश जाधव, राजेंद्र चाफेकर, प्रमोद पाटील, चंद्रकांत नेटारे, स्मिता कुलकर्णी, सचिन होळकर, संतोष पानगव्हाणे, बाळासाहेब जगताप, अमित शहा, उत्तम वाघ, रवी सोळसे, राजेंद्र कराड, बालेश जाधव, आदी आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले.
उपोषण सुरू झाल्यानंतर बाजार समिती प्रशासनाने लासलगाव मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष, बाजार समितीचे व्यापारी प्रतिनिधी तसेच व्यापारी वर्गाशी चर्चा केली.
या चर्चेत सध्या कांद्यासह सर्वच शेतीमालाच्या बाजारभावाची पातळी अधिक असल्याने व्यापाऱ्यांना बँकांकडून पुरेशा प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध करून घेण्यात अडचणी येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मात्र, ज्या शेतकऱ्यांना रोख चुकवती हवी आहे त्यांना रोख स्वरूपात, तर ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन चुकवती हवी आहे त्यांना त्यांच्या मागणीनुसार ऑनलाइन रक्कम अदा करण्यास व्यापारी वर्ग तयार असल्याचे बाजार समितीने पत्राद्वारे कळविले. तसेच कांद्याचा बाजारभाव सुमारे १,५०० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास आल्यानंतर व्यापारी वर्ग संपूर्ण चुकवती कायमस्वरूपी रोख स्वरूपात करण्यास तयार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
बाजार समितीशी संबंधित मागण्यांवरही योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, माजी खासदार समीर भुजबळ, तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी आंदोलनकर्ते, बाजार समिती प्रशासन आणि व्यापारी वर्ग यांच्यात मध्यस्थी करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर बाजार समिती प्रशासनाकडून उपोषण स्थगित करण्याबाबतचे पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. पत्रातील आश्वासनांनंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
यावेळी बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, उपसभापती संदीप दरेकर, सदस्या सुवर्णा जगताप, डॉ. श्रीकांत आवारे, सोनिया होळकर, छबू जाधव यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, व्यापारी प्रतिनिधी, तहसीलदार विशाल नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, पांडुरंग राऊत, शीतल शिंदे आदी उपस्थित होते.