खेडलेझुंगे-कोळगाव ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू
न्यायभूमी न्युज संस्थापक पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
खेडलेझुंगे दि.१४ ऑक्टोंबर / बाबा गिते
रुई फाटा ते खेडलेझुंगे आणि खेडलेझुंगे ते कोळगाव या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत वारंवार निवेदने,चर्चा आणि मागण्या करूनही प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर खेडलेझुंगे-कोळगाव ग्रामस्थांनी दि.१३ ऑक्टोबर २०२५ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

धर्मराज घोटेकर, प्रसाद घोटेकर, केदार घोटेकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गांवरील रस्त्यांची दुरवस्था,खड्डे,काटे,अतिक्रमण आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
तरीही शासन, संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.त्यामुळे आता लेखी हमीशिवाय मागे हटणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यानी ग्रामस्थांच्या साथीने दिला आहे.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या :
१) रुई फाटा–खेडलेझुंगे आणि खेडलेझुंगे–कोळगाव या दोन्ही रस्त्यांवरील काटे आणि अतिक्रमण तातडीने हटवावे.
२) रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत.
३) परिवहन मंडळाची बंद बस सेवा पुन्हा सुरु करावी.
४) रस्ते पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागणार याची लेखी हमी मिळावी.
५) मागील १० वर्षांतील खर्चाचा सविस्तर तपशील ग्रामस्थांना मिळावा.
६) निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर चौकशी व कारवाई करावी.
रस्त्यांवरील खड्डे, काटेरी झुडप आणि अतिक्रमणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतमाल वाहतूक, रुग्णवाहिका सेवा व शालेय बससेवेला अडथळे निर्माण होत आहे.
यामुळे या मार्गाने येणारी बस सेवा लासलगांव आगाराकडुन बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे.यामुळे शालेय विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत येण्या जाण्यास अडची निर्माण झालेल्या आहेत.
निफाड लासलगाव येथे महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा कालावधीत मोठी गैरसोय होत आहे.पालकांना शेतीची महत्त्वाची कामे सोडून विद्यार्थांना शाळेत सोडवावे लागते.
लोकप्रतिनिधींची जाणीवपुर्वक दुर्लक्षामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.आता तरी शासनाने डोळे उघडून वास्तव पाहावे.

अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र होईल. विद्यार्थ्याच्या परीक्षा कालावधी संपल्यानंतर विद्यार्थीही या आंदोलनात विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ सहभागी होऊन आंदोलन अधिकाधिक तीव्र होतील.
यावेळी सुरु असलेल्या लासलगाव ते इगतपुरी या १४७ कि.मी.लांबीच्या १,१०० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामातही मोठ्या अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सदरच्या कामाबाबत खालील मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत.
१) सदर कामाचे अंदाजपत्रकाचा फलक सार्वजनिकपणे लावावा.
२) अंदाजपत्रकाप्रमाणेच काम व्हावे.
३) संबंधित अधिकारी यांनी कामाचे परीक्षण करून अहवाल सार्वजनिक करावा.
४) साईड पट्ट्या मातीऐवजी खडी व मुरुमाने भराव्यात.
५) खराब व जुने पूल नूतनीकरण करून द्यावेत.
६) गावांच्या ठिकाणी चढण-उतरणाची सोय करून द्यावी.
७) गावांच्या हद्दीत दुभाजक व पथदिवे लावावेत.
८) भूमिगत गटारी प्रलंबित असलेल्या गावांमध्ये त्वरित गटारी टाकाव्यात.
९) सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर मार्ग का बदलण्यात आला याची माहिती मिळावी.
१०) रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढावे.



