Breaking
महाराष्ट्र

सहकार क्षेत्रातील कोहिनूर हरपला ज्येष्ठ नेते चांगदेवराव होळकर यांचे 95 वर्षी निधन

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 1 0 1 1 8

न्यायभूमी 

लासलगाव :दि.२३ जुलै कैलास उपाध्ये 

राज्यातील कांदा चळवळीला दिशा देणारे, नाफेडचे माजी अध्यक्ष,सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आणि शेतकऱ्यांचे अभ्यासू मार्गदर्शक चांगदेवराव होळकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

वयाच्या ९५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने लासलगावसह राज्यातील सहकार,कृषी आणि कांदा क्षेत्राने एक दूरदृष्टीचे नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

२४ जून १९३४ रोजी जन्मलेल्या होळकर यांनी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षापासून सामाजिक व राजकीय कार्याची सुरुवात केली.तब्बल सात दशकांहून अधिक काळ त्यांनी शेतकरी, सहकार आणि शिक्षण क्षेत्रासाठी अविरत कार्य केले.

कोरोना काळात मृत्यूशी झुंज देत त्यांनी यशस्वीपणे मात केली होती. मात्र अखेर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी १९८६ मध्ये वेफको संस्थेची स्थापना केली. सलग ३० वर्षे चेअरमन म्हणून त्यांनी संस्थेचे नेतृत्व केले. महाराष्ट्रातील कृषी सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था नाफेडमध्ये १९७० पासून संचालक, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष (चेअरमन) अशा विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. तसेच एनएचआरडीएफ (NHRDF) या संस्थेवरही चेअरमन आणि संचालक म्हणून त्यांनी मोलाची जबाबदारी सांभाळली.

शिक्षण क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले. के. के. वाघ शिक्षण संस्थेचे ते स्थापनेपासून सदस्य होते. लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे चेअरमन म्हणून त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.

 

सहकार क्षेत्रात त्यांनी कर्मवीर रानवड सहकारी साखर कारखाना, लासलगाव बाजार समिती, लासलगाव खरेदी-विक्री संघ तसेच नाशिक जिल्हा औद्योगिक खरेदी-विक्री संघात चेअरमन, संचालक आदी विविध पदांवर दीर्घकाळ काम केले. १९६२ पासून त्यांनी नाशिक जिल्हा औद्योगिक खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली.

 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही त्यांनी आपला ठसा उमटवला. लासलगाव ग्रामपंचायतीचे ते १५ वर्षे सदस्य तर पाच वर्षे सरपंच होते. त्यांच्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. भारतीय रेल्वे बोर्डावर शेतकरी प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

सहकार,कृषी आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत २०१० मध्ये त्यांना “बेस्ट सिटीझन ऑफ इंडिया” या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा होळकर,पुत्र किशोर, उद्धव,संजय आणि धनंजय असा परिवार आहे. माजी गृहमंत्री बापूसाहेब थिटे-पाटील यांचे ते व्याही होते. गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) येथील ग्रॅनोच इंडस्ट्रीज, पिंपळगाव निपाणी येथील के.जी.एस. शुगर फॅक्टरी आणि सातारा येथील यशराज इथेनॉल इंडस्ट्रीज यांच्या उभारणीतही त्यांचा मोलाचा वाटा होता.

चांगदेवराव होळकर यांच्या निधनाने शेतकरी चळवळीतील अभ्यासू नेतृत्व, सहकार क्षेत्रातील दूरदृष्टीचा मार्गदर्शक आणि लासलगावच्या विकासासाठी आयुष्य वेचणारा समाजधुरीण काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 0 1 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे