पिंपळगाव बसवंत आणि विंचूर परिसरातून विद्या लांडगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
न्यायभूमी न्युज दि.०५ जून विंचूर सुनील क्षीरसागर

गिर्यारोहण आणि साहसी पर्यटन क्षेत्रात महिलांची वाढती कामगिरी अधोरेखित करत, विद्या लांडगे यांनी जगातील सर्वोच्च शिखर परिसरातील ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ (५,३६४ मीटर) यशस्वीपणे सर केला आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय आणि अभिमानास्पद यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम ही साहस, चिकाटी आणि मानसिक ताकदीची खरी परीक्षा मानली जाते. हिमालयातील उंच पर्वतरांगांमध्ये अत्यंत प्रतिकूल हवामान,कमालीची थंडी,कमी होत जाणारे ऑक्सिजनचे प्रमाण, बर्फाच्छादित मार्ग आणि कठीण भौगोलिक परिस्थितीचा सामना करत ही मोहीम पूर्ण करावी लागते.
अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत विद्या लांडगे यांनी आपल्या जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ही मोहीम यशस्वीरीत्या फत्ते केली.
नव्या पिढीला आणि महिलांना प्रेरणा
गिर्यारोहण क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग ही अत्यंत सकारात्मक बाब मानली जात आहे. विद्या लांडगे यांच्या यशामुळे परिसरातील महिला आणि तरुणांमध्ये ट्रेकिंग व साहसी पर्यटनाबद्दल नव्याने उमेद निर्माण झाली आहे. “विशेषतः महिलांनी साहसी क्षेत्रात पुढे येऊन स्वतःची क्षमता सिद्ध करावी,” असाच संदेश त्यांच्या या कामगिरीतून मिळतो.
कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही कठीण ध्येय गाठता येते, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
विविध क्षेत्रांतून कौतुक
विद्या लांडगे या पिंपळगाव बसवंत येथील शिक्षक कै. जगन्नाथ लांडगे यांच्या ज्येष्ठ सुनबाई, तर विंचूर येथील सुभाष कापसे व आशा कापसे यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत.त्यांच्या या यशामुळे विंचूर आणि पिंपळगाव परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी विद्या लांडगे यांचे प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाद्वारे अभिनंदन केले आहे.
यांचे लाभले मार्गदर्शन व सहकार्य:
ही आव्हानात्मक मोहीम प्रसिद्ध एव्हरेस्टवीर रफिक शेख (ड्रीम ॲडव्हेंचर ट्रेक,छत्रपती संभाजीनगर) यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शंकर लांडगे (लातूर),भारती जाधव,मनोज मांडरे,चैताली आहेर,वसंत ठोंबरे,राजश्री जाधव, ‘शिवशंभू ट्रेकर्स’ आणि ‘फ्रेंड्स टूर्स क्लब’ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


