विंचूर येथे आषाढी वारी निमित्त ‘आझाद हिंद मित्र मंडळ’ व ‘महिला मंडळा’तर्फे दिंडी सोहळा उत्साहात संपन्न!

न्यायभूमी
विंचूर:दि.२६ जुलै
येथील ब्राह्मण गल्लीमध्ये आझाद हिंद मित्र मंडळ आणि ब्राह्मण गल्ली महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर भव्य ‘आषाढी वारी दिंडी सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते.
विंचूर येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिरापासून ते जुन्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत निघालेल्या या पालखी सेवेने आणि दिंडीने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.
‘ज्ञानबा-तुकाराम’, ‘माउली-माउली’ आणि ‘विठ्ठल रुक्मिणी’च्या जयघोषाने, टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडीचे आयोजन करण्यात आले होते . विंचूर दत्त मंदिर ते जुने विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या या पायी दिंडीत भजन आणि कीर्तनाची सुरेल साथ लाभली.
या दिंडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सर्व वयोगटातील महिलांचा उस्फूर्त सहभाग! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या सोहळ्याचा आनंद लुटला.
बाल-गोपाळांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली,तर महिला मंडळाच्या सदस्यांनी फुगड्या खेळत आणि अभंग गात वारीचा उत्साह द्विगुणित केला.
जुने विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दिंडीचे आगमन झाल्यानंतर आरती करण्यात आली.यावेळेस ब्राह्मण गल्ली येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


