लासलगावात १२ जुलै रोजी भव्य मोफत त्वचारोग व महिला आरोग्य तपासणी शिबिर
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
लासलगाव दि.११ जुलै निशिकांत पानसरे

ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी लासलगावात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. माजी सरपंच अफजलभाई शेख, जयदत्त होळकर मित्र मंडळ आणि लायन्स क्लब ऑफ लासलगाव प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने येथे भव्य मोफत त्वचारोग तपासणी व महिला आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमाला डॉक्टर्स असोसिएशन लासलगाव यांचे विशेष सौजन्य लाभले आहे.
हे शिबिर रविवार,दिनांक १२ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विंचूर रोडवरील ‘डॉ.भाग्यश्रीज् क्लिनिक’ (एस.एस.मोबाईल शेजारी) येथे संपन्न होणार आहे.
या शिबिरामध्ये प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ.सौ.भाग्यश्री सोनवणे (डिप्लोमा इन क्लिनिकल कॉस्मेटोलॉजी,ट्रायकोलॉजी अँड एस्थेटिक्स) या रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन व उपचार करणार आहेत.
या शिबिरामध्ये त्वचा,सौंदर्य आणि महिलांच्या विविध आरोग्य समस्यांवर प्रामुख्याने उपचार केले जातील.यामध्ये चेहऱ्यावरील काळे डाग, पुरळ,मुरम,खड्डे यांसारख्या सौंदर्य विषयक समस्यांसह केसांच्या व नखांच्या समस्या,केस गळणे,कोंडा आणि टक्कल पडणे यावर तज्ज्ञ मार्गदर्शन लाभणार आहे.

याशिवाय महिलांच्या आरोग्यविषयक तक्रारी, मासिक पाळीच्या समस्या,वजन वाढणे किंवा कमी होणे,लठ्ठपणा,थायरॉईड आणि पी.सी.ओ.डी.याविषयी विशेष समुपदेशन व उपचार केले जाणार आहेत.
या शिबिराचे उद्घाटन महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा सौ.वेदिकाताई जयदत्त होळकर यांच्या हस्ते होणार असून,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.स्वप्नील जैन हे भूषवणार आहेत.
ग्रामीण भागातील महिलांना एकाच ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन व उपचार मिळणार असल्याने,परिसरातील जास्तीत जास्त महिला भगिनींनी या शिबिराचा नक्की लाभ घ्यावा,असे आवाहन लायन्स क्लब ऑफ लासलगाव प्राईडचे अध्यक्ष हेमंत पवार यांनी केले आहे.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ लासलगाव प्राईडचे अध्यक्ष हेमंत पवार, सचिव दीपक जाधव,खजिनदार अमित गंभिरे यांच्यासह प्रकल्प संयोजक अजहर पठाण, निलेश लचके,सुमित होळकर,सुनील दराडे व शीतल जाधव हे विशेष परिश्रम घेत आहेत.
शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक असून,अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी नागरिकांनी ९२०९००२४५२ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.



