गौरव स्त्री शक्तीचा,सन्मान नारी शक्तीचा
एस.एन.डी.इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महिला दिन उत्साहात साजरा
न्यायभूमी न्यूज
कोपरगाव दि ११ मार्च विशेष प्रतिनिधी

मुलीप्रमाणे मुलालाही सातच्या आत घरात घेतल्यास वाईट घटना घडणार नाही. विद्या रक्ताटे(सरपंच कोकमठाण कोपरगाव)
नारी शक्तीचा सन्मान व स्त्री सक्षमीकरण या विषयाचे दृढीकरण व्हावे व स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने समान संधी व सन्मान मिळावा या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघटनेने ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.
याच अनुषंगाने एस.एन.डी.इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल बाभूळगाव येथे जागतिक महिला दिन आनंददायी कृती व उत्साहात संपन्न झाला. यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील महिला शिक्षिका यांनी केले होते.
कार्यक्रमाचे सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, व सरस्वती पूजनाने झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.विद्या रक्ताटे सरपंच कोकमठाण कोपरगाव या उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून भाटगाव या गावच्या अंगणवाडी सेविका श्रीम.अलका चिंचोळे या उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे एम.एस.ई.बी. येवला कर्मचारी श्रीम.सीमा कुंथळे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व महिला पालक व मान्यवरांचे स्वागत कला शिक्षक व विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून केले.
यानंतर विद्यार्थिनींनी स्त्री जन्मावर आधारित नाटिका सादर करत स्त्री जीवनातील विविध समस्या व समायोजन याबाबत नाटिका सादर करत स्त्री जन्माचे कौतुक केले. तसेच बाई पण भारी देवा या गाण्यावर इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर करत उपस्थित सर्वांचे मनोरंजन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व महिलांसाठी व मान्यवरांसाठी अल्पोपहार व चहाची व्यवस्था महिला शिक्षकांनी केलेली होती. याचा आस्वाद उपस्थित सर्वांनी घेतला. यानंतर सर्व उपस्थित महिला पालकांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे नियोजन करण्यात आले होते.
इयत्ता नववी च्या विद्यार्थिनींनी स्त्री जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. या खेळाचे बक्षीस स्पर्धात्मक होते यामध्ये उखाणा घेणे, हवेत गोटी उधाळून छोट्या कपमध्ये झेलणे यासारख्या खेळांचा समावेश करण्यात आला होता. प्रथम आलेल्या स्पर्धकास शाळेच्या वतीने पैठणी बक्षीस स्वरूपात देण्यात आली होती. तसेच महिलांसाठी विविध बक्षिसांचे नियोजन शाळेच्या माध्यमातून करण्यात आले होते.
यावेळी मत प्रतिपादन करताना सौ.विद्या रक्ताटे यांनी मुलींप्रमाणे मुलांना देखील नियम व शिस्त याचे धडे आईने दिल्यास कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नाही. प्रत्येक महिलेने आपले कर्तव्य बजावत असताना एक माता, भगिनी, आदर्श पत्नी म्हणून जीवनाकडे बघितले पाहिजे. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटांना सक्षमपणे सामोरे गेले पाहिजे.
मुलाप्रमाणे मुलीला देखील शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविले पाहिजे याची जबाबदारी एक महिला म्हणून आई म्हणून आपलीच आहे.कारण की या जगातील सर्वात मोठी देवी शक्ती ही स्त्री सोबत आहे म्हणून कोणत्याही संकटांना घाबरण्याची गरज नाही. तसेच झालेल्या मनोरंजनात्मक उखाणा घेण्याच्या स्पर्धेत विजयी झालेल्या सौ. सारिका विलास गाडे यांना प्रथम बक्षीस म्हणून पैठणी देण्यात आली.
तसेच उखाणा घेण्यामध्ये एका मिनिटात सात उखाणे घेतल्याबद्दल श्रीमती निशा भालेराव यांना भेटवस्तू देऊन दुसरा क्रमांक देण्यात आला. दुसऱ्या गटात हवेतील गोटी कागदी ग्लासमध्ये यशस्वीरित्या झेलण्यासाठी श्रीमती सुनिता घुसळे यांना दुसरा क्रमांक प्राप्त झाला त्यांना भेटवस्तू देण्यात आली.
दुसऱ्या गटातील प्रथम क्रमांक श्रीमती प्रियंका पाटील यांनी प्राप्त केला त्यांना त्यावेळी पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच विजयी झालेल्या महिलांना श्रीमती शेळके साक्षी व कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांच्या हस्ते तसेच शाळेचे प्राचार्य श्री.निलेश शिंदे यांच्या उपस्थितीत बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शेख शहनाज व कुमारी हिरे ऋतुजा यांनी केले. कार्यक्रमात सर्व महिला शिक्षकांचा सक्रिय सहभाग होता. तसेच महिला पालकांनी स्टेजवर नृत्य सादर केले. काही महिलांनी स्वरचित कविता सादर केल्या.
शाळेच्या शिक्षिका सौ. दवंगे यांनी स्त्री जन्मा वरील सुंदर कविता सादर केलीअशा स्वरूपाचा कार्यक्रम शाळेने आयोजित केल्यामुळे आम्ही दैनंदिन जीवनातील एक वेगळा दिवस आज जगू शकलो त्याबद्दल शाळेचे आभार असे प्रतिपादन उपस्थित महिला पालकांनी केले. व शाळेचे आभार व्यक्त केले. शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.संदीप पाटील यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमास पूर्णविराम दिला.
महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले अशाप्रकारे शाळेत महिला दिन हा अतिशय आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.


