लासलगावचे डॉ.चारुदत्त अहिरे यांना ‘महाराष्ट्र रत्न २०२६’पुरस्कार प्रदान
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
विंचूर दि. ०७ जून
निफाड तालुक्यातील लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.चारुदत्त मोतीराम अहिरे यांना ‘तेजस सेवा प्रतिष्ठान’तर्फे दिला जाणारा ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
संगमनेर येथील मालपाणी लॉन्सवर आयोजित “संविधान अमृत महोत्सव” सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ७५ जणांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अकोले मतदारसंघाचे आमदार डॉ.किरण लहामटे, तेजस सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रवींद्र घोसाळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. संघराज रूपवते आणि प्रमुख वक्ते प्रा.मुकुंद भारसाकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
डॉ.चारुदत्त अहिरे हे गेल्या १० वर्षांपासून ‘शीलामोती बहुउद्देशीय संस्थेच्या’ माध्यमातून आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीवर काम करत आहेत.
त्यांनी मोफत वैद्यकीय शिबिरे, ‘स्वच्छ जल मिशन’ अंतर्गत अल्प दरात शुद्ध पाणी पुरवठा, शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुविधा सेवा केंद्र,असंघटित मजुरांचे संघटन, व्यसनमुक्ती केंद्र आणि शालेय स्तरावर संविधानाचा प्रचार करण्यासाठी ‘संविधान गुणगौरव परीक्षा’यांसारखे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या याच योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले आदर्श संविधान हे एक किमया असून,त्याचे रक्षण करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
तर प्रमुख वक्ते प्रा.मुकुंद भारसाकळे यांनी महापुरुषांच्या प्रेरणेने संविधानाचे मूल्य जपतानाच आर्थिक साक्षर होण्याचे आवाहन केले आणि अकोला पॅटर्नला भेट देण्याचे सुचवले.
अध्यक्षीय भाषणात अॅड.संघराज रूपवते यांनी बाबासाहेबांच्या लढ्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या सोहळ्याला राज्यभरातून विविध क्षेत्रांतील नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


