Breaking
कृषीवार्ता

विंचूर येथील निकृष्ट MCB,सैल नट-बोल्ट अन् सदोष केबल जोडणीचा आरोप; महावितरणकडून शेतकऱ्यांची पुन्हा निराशा

वीज कंत्राटदाराचा मनमानी व भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर!

1 1 9 9 9 1

न्यायभूमी

विंचूर दि.०७ सप्टेंबर प्रतिनिधी

हनुमान नगर येथील चारी क्रमांक २१ वरील सालगुडे मामा डीपी व परिसरातील महावितरणच्या कंत्राटदारामार्फत करण्यात आलेल्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत या डीपीवरील पेटी फ्युज व आतील विद्युत उपकरणे बदलण्यात आली. यामध्ये फ्युज व MCB व इतर प्रकारचे स्पेअर बसविण्यात आले;मात्र हे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याने अवघ्या काही तासांतच MCB फेल होण्यास सुरुवात झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

MCB फेल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित वायरमनशी संपर्क साधला असता ते बाहेरगावी असल्याने तातडीने दुरुस्ती करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी त्या दिवशी संबंधित शेतकऱ्यांचे विद्युत पंप बंद राहिले. दुसऱ्या दिवशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता वायरमनचा मोबाईल स्विच ऑफ असल्याचे समोर आल्याने वीजपुरवठ्याचे संकट कायम राहिले. त्यादिवशी रविवार असल्याने लिखित तक्रार करता आली नसल्याने वायरमनला फोन करण्यात आला

पावसाची प्रतीक्षा अन् वीजपुरवठ्याचा लपंडाव; शेतकरी दुहेरी संकटात

एकीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करत आहेत. विहिरींमध्ये उपलब्ध असलेले थोडेफार पाणी पिकांना सिंचनासाठी देण्यासाठी शेतकरी अक्षरशः जिवाचे रान करत असताना, दुसरीकडे विजेचा सुरू असलेला लपंडाव आणि वारंवार होणारे इमर्जन्सी लोडशेडिंग यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मिळणाऱ्या मोजक्या वीजपुरवठ्याच्या वेळेत डीपीमध्ये बिघाड, पर्सनल लाईनमध्ये समस्या आणि विद्युत पंप बंद राहणे यामुळे पिकांना पाणी द्यायचे कसे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांनी स्वतः प्रयत्न करून डीपी सुरू केली असता; १५-२० मिनिटांत दुसरा MCB फेल

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अखेर शेतकऱ्यांनी स्वतः डीपीवर जाऊन प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातून डीपी पूर्ववत सुरू झाली; मात्र अवघ्या १५ ते २० मिनिटांत दुसरा MCB देखील फेल झाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक सर्व MCB निकामी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

डीपीची क्षमता, त्यावरील विद्युत भार आणि तांत्रिक निकष लक्षात घेऊन त्यानुसार योग्य क्षमतेचे MCB बसविणे आवश्यक असताना, केवळ काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने निकृष्ट दर्जाचे किंवा योग्य क्षमतेचे नसलेले साहित्य वापरण्यात आले का,असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

नट-बोल्टही सैल; कामाचा व्हिडिओ शेतकऱ्यांकडे

यानंतर शेतकऱ्यांनी डीपीची पाहणी केली असता, कंत्राटदारामार्फत करण्यात आलेल्या कामातील अनेक नट-बोल्ट पूर्णपणे सैल असल्याचे आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. आवश्यक साधनांच्या साहाय्याने ते व्यवस्थित टाईट करण्यात आले नसल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग शेतकऱ्यांकडे उपलब्ध असून, संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबत चौकशी झाल्यास हे पुरावे सादर करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

‘ही परिस्थिती केवळ एका डीपीची नाही’

सदर प्रकार केवळ सालगुडे मामा डीपीपुरता मर्यादित नसून, परिसरात बसविण्यात आलेल्या इतर डीपींवरील कामांच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

महावितरणने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने विविध ठिकाणी केलेल्या कामांची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करावी. निकृष्ट साहित्य, सदोष जोडणी किंवा नियमबाह्य काम आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

मेन सप्लाय केबलचे कव्हर उघडे; टेपिंगही जळाल्याचा आरोप

याच डीपीवरील मेन सप्लाय केबलचे कव्हर काही ठिकाणी पूर्णपणे उघडे झाले असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी केवळ हाय-व्होल्टेज केबलला टेपिंग करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, ही टेपिंग उष्णतेमुळे जळून गेल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

याशिवाय हाय-व्होल्टेज केबल MCB मध्ये जोडताना योग्य आकाराचे क्लॅम्प उपलब्ध नसल्याने छोट्या आकाराच्या क्लॅम्पमध्ये केबल बसविण्यासाठी केबलचे अंदाजे ८ ते १० छडे कापण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

केबलचे छडे कमी केल्यामुळे जोडणीची क्षमता कमी झाली, परिणामी पुरेसा वीजपुरवठा मिळाला नाही आणि केबल गरम होऊन MCB खराब झाले, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. या आरोपांची तांत्रिक तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.

काम पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांची तपासणी कुठे?

महावितरणच्या कंत्राटदारामार्फत काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य, जोडणी, सुरक्षा व्यवस्था आणि तांत्रिक निकष तपासणे अपेक्षित असते. त्यानंतरच काम पूर्ण झाल्याची नोंद करून संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी केली जाते.

मात्र, प्रत्यक्ष कामाचा दर्जा तपासला गेला असेल तर एवढ्या कमी कालावधीत MCB का फेल झाले? नट-बोल्ट सैल कसे राहिले? केबलचे कव्हर उघडे का राहिले? योग्य आकाराचे क्लॅम्प का वापरण्यात आले नाहीत? आणि कामाचे फायनलायझेशन कशा आधारावर करण्यात आले? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत

कंत्राटदार-अधिकारी संगनमताचा संशय? चौकशीची मागणी

कामाचा दर्जा आणि त्यानंतरची परिस्थिती पाहता, संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांमध्ये संगनमताचा भाग आहे का, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. मात्र, हा केवळ नागरिकांकडून व्यक्त केला जाणारा संशय असून त्याची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.

कामाच्या मंजुरीपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत, वापरलेल्या साहित्यापासून अंतिम तपासणीपर्यंत आणि फायनलायझेशन पेपरवरील स्वाक्षऱ्यांपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

‘अधिकारी एसी केबिनमधून बाहेर पडणार कधी?’

“अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून कंत्राटदारांच्या अहवालावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन कामांची पाहणी करणे गरजेचे आहे. महिन्यातून किमान एक-दोन वेळा डीपी, पोल, वीजवाहिन्या आणि अर्थिंग व्यवस्थेची प्रत्यक्ष तपासणी झाली तर अशा प्रकारचा भोंगळ कारभार रोखता येईल,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

पडलेले पोल, झोळ आलेल्या वीजवाहिन्या अन् अर्थिंगचा प्रश्न

 

सदर डीपीवरील समस्यांबरोबरच परिसरातील काही विद्युत पोल पडलेल्या अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी वीजवाहिन्यांना झोळ आलेली आहे. काही ठिकाणी जुन्या वायरमनकडून अर्थिंगच्या ताराच काढून नेण्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

त्यामुळे संबंधित विभागाने केवळ MCB बदलून प्रश्न मिटवू नये, तर संपूर्ण परिसरातील डीपी, पोल, वीजवाहिन्या, केबल जोडणी आणि अर्थिंग व्यवस्थेची संपूर्ण तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी

निकृष्ट दर्जाचे काम किंवा साहित्य वापरल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करून त्याचा परवाना रद्द करावा. तसेच कामाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना वेळेवर आणि सुरळीत वीजपुरवठा मिळणे हा त्यांच्या शेतीचा आणि उपजीविकेचा प्रश्न आहे. त्यामुळे डोंगरगाव व हनुमान नगर फिटरवर तसेच सालगुडे मामा डीपीसह परिसरातील सर्व डीपींच्या कामांची तातडीने चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी आणि सर्व त्रुटी तातडीने दूर करून सुरक्षित व सुरळीत वीजपुरवठा सुरू करावा,अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 9 9 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे