न्यायभूमी न्यूज
येवला दि ०४ डिसेंबर प्रतिनिधी एकनाथ भालेराव
अवेळी पाऊस, वातावरणात होणारे अचानक बदलामुळे पिकांंवरील वाढणारे किड आणि रोगांचे वाढते प्रमाण यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
पर्वी उन्हाळ्यात कडक ऊन, पावसाळ्यात पाऊस पडायचा, आणि हिवाळ्यात थंडी पडायची, आता पावसाला पावसाळाच हवा असे नाही. कधीही हा बिगरमोसमी अवेळी पडणारा पाऊस यामुळे शेतीचेही अर्थशास्त्र बिघडले आहे.
जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वार्मिंग) याला कारणीभूत मानत असले तरी संपूर्ण जग निसर्गाच्या विविध कोपांना सातत्याने सामोरे जात आहे.
पावसाळ्यात पाऊस एकाच वेळी बहुतांशी भागत पडत असे, आता एका भागात अतिवृष्टी तर अन्यत्र अवर्षण असे चित्र दिसते. वातावरणातही बदल होत आहे. बहुतांशी वेळी ढगाळ वातावरण असल्याचे जाणवते. हे वातावरण पिकांवर पडणारे विविध रोगांना पोषक असते. त्यामुळे शेती व्यावसायाला हे घातक ठरत आहे. यामुळे पिक पॅटर्न बदलण्याची गरज भासू लागली आहे.
सध्या शेतातील कपाशी,कांदे, गहू, हारबरा आदी पिकांंवर बुरशीजन्य,बोंडअळी, कीड, किटक, मावा,करपा, मुळकूज, मिलीबग (खवल्या) आदी रोगांनी हल्ला केला आहे. महागडी औषधे फवारुन शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. त्यातच भाव, योग्य बाजारपेठ, ह्या ही समस्या शेतकर्यांपुढे असतात.
कांदा, भाजीपाला यांना बाधा होते. त्यातून मका पीक हे जरी तग धरुन असले तरी त्या मका पिकावर गेल्या तीन वर्षांपासून लष्करी अळी ने जबरदस्त हल्ला केला आहे.
नाशिक जिल्यातील कांदा पिकवणाऱ्या भागात जमिनीतील बुरशी चे प्रमाण वाढून कांद्यावर पीळे पडणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत आहे ,भविष्यात कांदा पीक या रोगामुळे मोठया प्रमाणावर धोक्यात येऊ शकते असे कांदा संशोधक याचे मत आहे.
पिकपध्दती बदलून या हवमानाला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न होण्यासाठी शेतकर्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे. शेडनेट, पॉलिहाऊस मध्ये पिके घेण्याची वेळ आली आहे. या दोन्ही मध्ये वातावरण नियंत्रित करण्याची ताकद आहे.
सरकारने यासाठी सर्वसामान्य शेतकर्यांना अनुदान देण्याची गरज आहे. सरकार अनुदान देते पण ते मर्यादित शेतकर्यांना! सर्व शेतकर्यांना यातून पुढे नेण्यासाठी सर्वच शेतकर्यांना अनुदानाची गरज आहे. यासाठी लाभार्थ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. ड्रॉ काढला जातो, 500 शेतकर्यांमधून पाचच लाभार्थी ठरतात. ऊसासारखे पिक, तसेच औषधी वनस्पतींच्या लागवडीची गरज निर्माण झाली आहे.
तेलबिया त्यात सुर्यफूल, करडई यांचे उत्पादन घेणेबाबत व त्यांना बाजारपेठ निर्माण होणेसाठी सरकारी यंत्रणेने शेतकर्यांनी मार्गदर्शनाची गरज आहे. मसाल्याचे कोणते पिक आपल्याकडे येते, शेतकर्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणार्या पिकांची लागवडी साठी उद्बोधन होणे गरजेचे आहे.
येवला तालुक्यात कपाशी चे क्षेत्र घटले आहे. वातावरणाचा अनिष्ठ परिणाम अनेक पिकांवर झाला. अवेळी पावसाने बहार व्यावस्थापन होत नाही. मावा,करपा, देवी, मुळकूज, मिलीबग, लोकरीकिड यांचा प्रादूर्भाव होतांना दिसत आहे. औषध फवारणीवर मोठा खर्च होतो. शेतकर्यांना मोठ्या अर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
दिवसेंदिवस वातावरणात मोठे बदल होत आहे. पावसाळा नेमका कधी हे कोढे आता अलिकडे पडत आहे. याचा परिणाम म्हणून उभी पिके रोगांनी जर्जर होतात.
परिणामी शेतकर्यांचे नुकसान होते. यासाठी आता पिक पॅटर्न बदलण्याची वेळ आली आहे.
रोगांना प्रतिकार करणार्या वाणांचे संशोधन होणे आता गरजेचे आहे. याशिवाय कोणत्या पिकांवर अशा वातावरणात रोग येत नाही, अशी नगदी पिके घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पॉलिहाऊस, शेडनेट यासाठी सरकारने सरसरकट सर्वच शेतकर्यांना अनुदान देण्याची गरज आहे. तरच शेती आणि शेतकरी तगेल!
शेतकऱ्यांना नुकसानी पोटी पंचनामे करून अनुदान देण्याचा जो शासन प्रयत्न करते तो फारच तोकडा आहे आणि मिळणारे अनुदान व होणारे नुकसान याची तुलना केली तर अनुदानातून शेतकऱ्यांना काहीच फायदा दिसत नाही.
त्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा आहे त्या आशा नियमित योग्य दाबाने दिवसा वीज पुरवठा करावा,व शेतीमालाला उत्पादन खर्चावर नफा देणारा हमीभाव द्यावा ,अनुदानाची भीक नको हवे घामाचे दाम


