श्रीहरी हायटेक नर्सरी’तून दोन वर्षांत उल्लेखनीय प्रगती
पुरणगाव येथील तरुण शेतकऱ्याची यशोगाथा
न्यायभूमी
येवला दि.१६ जानेवारी पुष्पा पाटील

शेतीपूरक व्यवसाय म्हणून रोपवाटिका व्यवसायाकडे तरुण शेतकऱ्यांचा कल वाढत असताना,पुरणगाव येथील तरुण शेतकरी श्री. समाधान आनंद घामरे यांनी स्थापन केलेली श्रीहरी हायटेक नर्सरी अल्पावधीतच यशस्वी ठरत आहे.
अवघ्या दोन वर्षांत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांनी नर्सरी व्यवसायात उल्लेखनीय प्रगती साधली असून,परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही नर्सरी प्रेरणास्थान बनली आहे.
पारंपरिक शेतीसोबतच नव्या संधींचा विचार करत श्री. समाधान घामरे यांनी हायटेक नर्सरी व्यवसायाची सुरुवात केली.
शेडनेट तंत्रज्ञान,ट्रे पद्धतीने रोप निर्मिती, सुधारित वाणांची निवड तसेच शास्त्रीय पद्धतीने पाणी व खत व्यवस्थापन यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. परिणामी त्यांच्या नर्सरीतून तयार होणारी रोपे दर्जेदार,निरोगी व उत्पादनक्षम ठरत आहेत.
या नर्सरीतून भाजीपाला तसेच इतर पिकांची उच्च प्रतीची रोपे तयार करून ती पुरणगावसह शेजारील गावांतील शेतकऱ्यांना पुरवली जात आहेत.
रोपांची गुणवत्ता आणि योग्य मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढला असून मागणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या व्यवसायातून त्यांना नियमित व स्थिर उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे.
अल्प भांडवलात सुरू केलेला हा उपक्रम यशस्वीपणे उभा राहिला असून श्रीहरी हायटेक नर्सरी ही परिसरातील तरुण शेतकऱ्यांसाठी आदर्श उदाहरण ठरत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, सातत्यपूर्ण मेहनत आणि नियोजनबद्ध कामकाज केल्यास नर्सरी व्यवसायातून शाश्वत उत्पन्न मिळू शकते, हेच या यशोगाथेतून स्पष्ट होत आहे.

