निफाड तालुक्यात युरिया टंचाई आंदोलनाची बातमी प्रसिद्ध होताच कृषी विभागाच्या तात्काळ हालचाली; लासलगाव,विंचूरला युरिया उपलब्ध
न्यायभूमी

न्यायभूमी
लासलगाव दि.०४ ऑगस्ट निशिकांत पानसरे
निफाड तालुक्यात खरीप हंगामाच्या मध्यावर निर्माण झालेल्या युरिया खताच्या तीव्र टंचाईची बातमी प्रसिद्ध होताच कृषी विभागाने हालचाल सुरू केली आहे.
निफाड पंचायत समितीचे कृषी अधिकारी संदीप मोगल यांनी लासलगाव येथे पाच व विंचूर येथे दोन दुकानात अतिरिक्त युरीया उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले.
मा. पंचायत समिती सदस्य श्री प्रकाश पाटील यांनी आठ दिवसांत शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध न झाल्यास कृषी विभागाच्या कार्यालयात युरिया ओतून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर कृषी विभागाने तातडीने उपलब्ध साठ्याचे नियोजन सुरू केले.
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने उपलब्ध साठ्याबाबत माहिती देत पुरवठा वाढविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
कृषी अधिकारी संदीप मोगल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,लासलगाव येथील धनंजय कृषी सेवा केंद्र,शेतकरी ॲग्रो एजन्सी वेळापूर, कृषी उद्योग येथे युरिया उपलब्ध आहे. लासलगाव खरेदी-विक्री संघातील युरियाचा साठा संपला असला तरी तेथे तातडीने नवीन साठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
लासलगाव येथील उत्तम फर्टिलायझर्स येथे ४०० ते ५०० गोण्या, तर विंचूर येथील माऊली फर्टिलायझर्स आणि सुनील मालपाणी यांच्या आस्थापनांमध्ये सुमारे ६५० ते ७०० गोण्यांचा साठा उपलब्ध आहे. तसेच खत विक्रीवेळी लिंकिंग केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून अशा प्रकारची सक्ती करणाऱ्या विक्रेत्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
तालुक्यात मका, सोयाबीन, ऊस व भाजीपाला पिकांना सध्या युरियाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असताना अनेक कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. दुसरीकडे विष्णुनगर येथे पोलिसांनी तब्बल ८८ लाख ३६ हजार ६२४ रुपयांचा अनुदानित युरियाचा साठा जप्त केल्याने कृत्रिम टंचाई व काळाबाजाराचा संशय अधिक गडद झाला आहे.
कृषी विभागाने अतिरिक्त युरिया उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली असली, तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात खत मिळते का, तसेच कृत्रिम टंचाई, लिंकिंग व काळाबाजाराला आळा बसतो का, याकडे आता निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
• लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असल्याने नाशिकसह चार जिल्ह्यांतील शेतकरी येथे कांदा विक्रीसाठी येतात व परतीच्या प्रवासात रासायनिक खते खरेदी करतात. त्यामुळे लासलगाव व विंचूरसाठी बफर स्टॉकमधून अतिरिक्त युरिया उपलब्ध करून द्यावा.
तसेच शेतकऱ्यांना इतर उत्पादने घेण्याची सक्ती करणाऱ्या ‘लिंकिंग’ पद्धतीचा अवलंब करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध करून द्यावा.
आंदोलक श्री प्रकाश पाटील
मा. पंचायत समिती सदस्य


