विंचूर येथे कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा सन्मान!
शाल, श्रीफळ, मिठाई व भेटवस्तू देऊन गौरव; पत्रकारितेच्या सामाजिक बांधिलकीचा केला सन्मान

न्यायभूमी
विंचूर | दिनांक ०६ नोव्हेंबर

समाजातील सामान्य माणसाचा आवाज बनून अन्यायाविरुद्ध लेखणी चालविणारे, जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणारे आणि लोकशाहीची मूल्ये जपणाऱ्या पत्रकारांचा विंचूर येथे सन्मान करण्यात आला. कुणाल दराडे फाउंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष कुणाल नरेंद्र दराडे यांच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
विंचूर येथील हॉटेल शेतकरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांना शाल, श्रीफळ, मिठाई आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
पत्रकारिता हे केवळ बातम्या प्रसिद्ध करण्याचे माध्यम नसून समाजातील वास्तव परिस्थिती जनतेसमोर मांडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, विकासाचे प्रश्न, प्रशासनातील त्रुटी आणि लोकहिताच्या विषयांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून करीत असतात.
अनेकदा प्रतिकूल परिस्थितीतही वस्तुनिष्ठ आणि निर्भीड पत्रकारिता जपण्याचे त्यांचे कार्य समाजासाठी मोलाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
पत्रकारांचा सन्मान म्हणजे केवळ व्यक्तींचा गौरव नसून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा, कर्तव्यनिष्ठेचा आणि लोकशाहीप्रती असलेल्या योगदानाचा सन्मान असल्याची भावना या उपक्रमातून व्यक्त झाली.
या कार्यक्रमात पत्रकार मच्छिंद्र साळुंके, राजेश भडांगे, जनार्दन चव्हाण, सुनील शिरसागर, दत्तात्रय दरेकर, रोहन सरोदे, अभय पाटील आणि संदीप धनवटे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी नाना जेऊघाले, इमरान मोमीन, दिलीप चव्हाण, सुलतान पठाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पत्रकारांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम सामाजिक सलोखा आणि माध्यमांविषयी आदराची भावना अधिक दृढ करणारा ठरला.
विशेष संदेश : पत्रकारांच्या लेखणीला मिळणारा सन्मान हा समाजातील सत्य, न्याय आणि लोकशाही मूल्यांना दिलेला सन्मान आहे.




