नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून ७९ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
गोदावरी काठावरील नागरिकांनी दक्षता घ्यावी
न्यायभूमी
नाशिक – दि. २८ सप्टेंबर सुनील क्षीरसागर
नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून आज (दि.२८ सप्टेंबर २०२५) दुपारी २ वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पातून सुरुवातीला ६८,४८० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असून,त्यात ११,०६१ क्युसेक्सने वाढ करून एकूण ७९,५४१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.
या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या खालच्या प्रवाहात पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नदीपात्रात तसेच किनाऱ्यावर अडकलेली जनावरे, मालमत्ता सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनल श्रावणे यांनी दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे की,पावसामुळे विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे गोदावरी नदीपात्र परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



