स्वर्गीय चांगदेवराव भागवतराव होळकर यांच्या कृषी, सहकार व शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरव म्हणून त्यांना “कर्मयोगी” ही उपाधी प्रदान करण्यात यावी – नंदकुमार डागा
दि लासलगांव मर्चन्टस् असोसिएशनच्या शोकसभेत एकमताने ठराव संमत

न्यायभूमी

लासलगांव दि.२७ जुलै : आशिया खंडातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठेच्या शिल्पकारांपैकी एक, कृषी, सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक, नाफेडचे माजी चेअरमन तथा लासलगांवचे भूषण चांगदेवराव भागवतराव होळकर (दादा) यांच्या निधनानिमित्त दि लासलगांव मर्चन्टस् असोसिएशन लि., लासलगांव व कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव यांचे वतीने सोमवार, दि. २७ जुलै, २०२६ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज नवीन कांदा बाजार आवारातील प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात सर्व मार्केट घटकांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली.
यावेळी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्वर्गीय दादांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात पदापेक्षा कार्याला आणि सत्तेपेक्षा सेवेला अधिक महत्व दिले. लासलगाव ग्रामपंचायतीपासून ते राष्ट्रीय स्तरावरील नाफेडच्या चेअरमनपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा सामान्य माणसाच्या विश्वासाचा, प्रामाणिक नेतृत्वाचा आणि अथक परिश्रमाचा आदर्श होता.
त्यांनी नाफेड, एनएचआरडीएफ, वेफको, लासलगाव खरेदी-विक्री संघ, नाशिक जिल्हा कांदा-बटाटा उत्पादक सहकारी संघ, रानवड सहकारी साखर कारखाना तसेच कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था, नूतन विद्या प्रसारक मंडळ आदी संस्थांमध्ये अत्यंत प्रभावी नेतृत्व करत कृषी, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात मोलाची भर घातली.
ते पुढे म्हणाले की, स्वर्गीय दादांनी कोणत्याही पदाचा वैयक्तिक लाभासाठी कधीही उपयोग केला नाही. त्यांनी शेतकरी, व्यापारी, सहकारी संस्था आणि समाज यांना केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर निस्वार्थ भावनेने कार्य केले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय्य दर, बाजारपेठेचा विकास, निर्यातवाढ, कृषी धोरणे, सहकार चळवळीचे बळकटीकरण आणि ग्रामीण शिक्षणाचा विस्तार या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दूरदृष्टीने काम केले. त्यांचे संपूर्ण जीवन हे कर्मप्रधान, मूल्याधिष्ठित आणि समाजसेवेला समर्पित असल्याने त्यांना “कर्मयोगी चांगदेवराव भागवतराव होळकर” ही उपाधी प्रदान करणे, हीच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल.
विशेषतः आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले. कांदा व्यापार, बाजार व्यवस्थापन, निर्यात धोरण, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने केंद्र व राज्य शासनाला अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. कृषी विषयातील त्यांचा गाढा अभ्यास आणि सहकार क्षेत्रातील दूरदृष्टीमुळे त्यांना देशभरातील शेतकरी, व्यापारी आणि सहकारी क्षेत्रात विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले.
स्वर्गीय दादांचे व्यक्तिमत्त्व केवळ सहकार क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, शिक्षणसंस्था सक्षम व्हाव्यात आणि ग्रामीण युवकांना संधी मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले.
अभ्यासू वृत्ती, शिस्तप्रिय स्वभाव, साधेपणा, प्रामाणिकपणा, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि समाजहिताची अखंड तळमळ हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच ते अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान राहतील.
यानंतर सभेमध्ये स्वर्गीय चांगदेवराव भागवतराव होळकर यांच्या कृषी, सहकार, शिक्षण आणि शेतकरी हितासाठीच्या अतुलनीय, निस्वार्थ व आजीवन योगदानाचा गौरव म्हणून त्यांना “कर्मयोगी चांगदेवराव भागवतराव होळकर” ही उपाधी शासनाने अथवा संबंधित संस्थांनी अधिकृतपणे प्रदान करावी, असा ठराव नंदकुमार डागा यांनी मांडला. उपस्थित सर्व व्यापारी, शेतकरी, सभासद आणि मान्यवरांनी हा ठराव एकमताने मंजुर करून जोरदार समर्थन व्यक्त केले.
यावेळी अखिल भारतीय वाईन उत्पादक महासंघाचे अध्यक्ष जगदीश होळकर, दि लासलगांव मर्चन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष नितीनकुमार जैन, विश्वस्त ओमप्रकाश राका, ॲड. रमेश शिंदे, सभासद व्यापारी वाल्मिकराव जाधव, विलास देवरे, बाजार समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत आवारे, व्यापारी सदस्य प्रविण कदम, कामगार सदस्य रमेश पालवे तसेच बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी स्वर्गीय दादांच्या कार्याचा गौरव करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सभेचे सूत्रसंचालन मनोज जैन यांनी केले.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) नाशिक विभागीय अध्यक्ष अशोक नाना होळकर, वेफकोचे चेअरमन संजय होळकर, किशोर होळकर, दत्तात्रय होळकर, दि लासलगांव मर्चन्टस् असोसिएशनचे उपाध्यक्ष ऋषभ राका, विश्वस्त पुरुषोत्तम चोथाणी, सौरभ जैन, सहाय्यक अशोक गायकवाड, लासलगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अफजल शेख, बाजार समितीचे सदस्य बाळासाहेब दराडे, माजी सदस्य सचिनकुमार ब्रम्हेचा, धान्य व्यापारी सागर थोरात, रामभाऊ घाडगे, शरद होळकर, बाळासाहेब बोरसे, कांदा व्यापारी अमर ब्रम्हेचा, विलास जगताप, संतोष माठा, सुरेश बोडके, रोशन माठा, राजू मुणोत, मनीष सारस्वत, तुषार देवरे, आनंदा गिते, संदीप गोमासे, अजय जाधव, नाना सुर्यवंशी, विष्णु जाधव, बाजार समितीचे सहाय्यक सचिव सुशील वाढवणे, सर्व लिलाव प्रमुख काकासाहेब जगताप, कांदा लिलाव प्रमुख महेश धामणे, भाजीपाला लिलाव प्रमुख संजय होळकर, नंदकुमार गोधडे, मनोज शेजवळ, गौरव निकम, राहुल शेजवळ, गणेश आहेर यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी, मदतनीस, कांदा भरणारे हमाल, शेतकरी बांधव व नागरिक उपस्थित होते.


