निफाड पूर्व भागातील देवगाव फाटा बिबट्या प्रवण क्षेत्र?
निफाड पूर्व भागात बिबट्याचा दहशत कायम
न्यायभूमी न्यूज
देवगाव दि ३१ डिसेंबर:-अजिज काद्री
निफाड पूर्व भागात बिबट्याने उच्छाद मांडला आहे. भरवस फाटा ते शिर्डी राज्य मार्गावरील देवगाव फाट्यावर गेल्या दोन तीन महिन्यापासून बिबट्या वास्तव्यास आहे. आजपोवतो बिबट्याने ९ नागरिकांवर हल्ला करून जखमी केले आहे.
त्यामुळे या परिसरात सायंकाळी अघोषित संचारबंदी असते. त्यामुळे वनविभागाने देवगाव फाटा परिसर बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करावे तसेच येथील नागरिकांना दुसरीकडे निवासाची सोय करावी अशी उद्विग्न मागणी नागरिकांनी केली आहे.
निफाड पूर्व भागात शिरवाडे, वाकद, देवगाव फाटा, मानकर वस्ती, ओतुरकर वस्ती, फिरस्ती माता परिसर, निकम वस्ती, शिंदे वस्ती आदी ठिकाणी बिबट्याचे संध्याकाळ पासूनच नियमित दर्शन होते. या परिसरात दोन-तीन बिबटे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आजपर्यंत बिबट्याने दुचाकीस्वार तसेच शेतात काम करणाऱ्या नऊ शेतकऱ्यांवर हल्ले केले आहेत. वाकद शिवारात शिंदे वस्तीवरील नाल्याजवळ रात्रीचे वेळी घरी जात असताना वाल्मीक गवळी या गोरक्षक व त्याच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे.
त्यातच काल दि.३० डिसेंबर रोजी सायंकाळी मंगेश देवचंद मधे वय ३२, भगिनाथ मच्छिंद्र जाधव वय ४२ रा.कन्नड या ऊसतोडणी कामगारांवर बिबट्याने हल्ला केल्याने ऊसतोडणी कामगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून या दहशतीमुळे या परिसरातील ऊस तोडणी ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
गुजरातहुन शिर्डी येथे शेकडो भाविक या मार्गे पायी जात असतात, देवगाव हे शाळा, महाविद्यालयाचे केंद्र असल्याने शेकडो मुले या रस्त्याने ये जा करतात.
बिबट्याची दहशत असल्याने वस्त्यांवरील शेतकऱ्यांना आपल्या लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी व घेण्यासाठी सोबत जावे लागत आहे.
शेतामध्ये पाणी भरण्यासाठी व शेतामधील काम करण्यासाठी मजूर मिळत नाही, काही ठिकाणी रात्रीच्या वेळी बिबट्याने वासरांवर हल्ले केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या गुरे वासरांच्या संरक्षणासाठी जाळी बांधलेली असूनही वासरांच्या संरक्षणासाठी रात्री दोन-तीन वेळेस फटाक्याचा आवाज करावा लागत आहे.
बिबट्याने वस्त्यांवरचे कुत्रे संपवलेले आहे. वनविभागाने देखावा म्हणून या परिसरात पिंजरे लावले आहेत.
मात्र त्यात बिबट्याचे खाद्य न ठेवल्याने बिबटे या पिंजऱ्याकडे फिरकत देखील नाही.त्यामुळे वनविभागाने मोठे रेस्क्यू ऑपरेशन करून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
येत्या दोन दिवसात बिबट्या जेरबंद न केल्यास देवगाव फाटा बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करून येथील नागरिकांची दुसरीकडे निवासाची व्यवस्था करावी अशी उद्विग्न मागणी ग्रामस्थांनी केली आहे.